केरळमध्ये ‘बंद’ला हिंसक वळण !

  • पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवरील धाडींचे प्रकरण

  • सरकारी बसगाड्यांची तोडफोड

  • पोलिसांवर आक्रमण

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय यांनी देशभरातील १५ राज्यांत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ९३ ठिकाणांवर घातलेल्या धाडीतून १०६ जणांना अटक केल्यानंतर पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांकडून केरळमध्ये २३ सप्टेंबरला बंदचे आयोजन करण्यात आले होते. याला हिंसक वळण लागले. तसेच शेजारील तमिळनाडूमध्येही हिंसाचार करण्यात आला. केरळच्या थिरुवनंतपूरम्, कोल्लम, कोझिकोड, वायनाड आणि अलप्पुझा यांसह विविध जिल्ह्यांमध्ये केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली. सकाळी कन्नूरमधील नारायणपारा येथे वितरणासाठी वर्तमानपत्रे घेऊन जाणार्‍या वाहनावर पेट्रोल बाँब फेकण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले.

१. कोची शहरामध्ये सरकारी बसगाड्यांची तोडफोड करण्यात आली. कोल्लम जिल्ह्यातील पल्लिमुक्कू येथे पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर आक्रमण केले. यात २ पोलीस घायाळ झाले.

२. अलाप्पुझा येथे केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्या, एक टँकर लॉरी आणि काही इतर वाहनांची दगडफेकीत हानी झाली.

३. कोझिकोड आणि कन्नूर येथे पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत १५ वर्षीय मुलगी आणि एक रिक्शाचालक किरकोळ घायाळ झाले.

संपादकीय भूमिका

‘केरळमध्ये माकप आघाडीचे सरकार असतांना त्याने हा हिंसाचार का रोखला नाही ?’, याचे उत्तर दिले पाहिजे !