प्राचीन‌ जगदंबा मंदिर वाचवण्‍यासाठी पोखरापूर ग्रामस्थांचे पुण्‍यात जागरण आंदोलन !

पुणे – पुरातत्व विभागाने पोखरापूर (ता. मोहोळ) येथील प्राचीन‌ जगदंबा मंदिराला धोका पोचणार नाही, याची दक्षता घ्यावी, त्यानुसार नवीन महामार्ग आराखडा सिद्ध करावा, असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय, पंढरपूर यांना १७ जून २०२२ या दिवशी दिले होते. देवस्थान ट्रस्टच्या वतीनेही वारंवार निवेदने दिली; परंतु महामार्ग प्राधिकरण या सर्वांकडे दुर्लक्ष करून अवैधरित्या महामार्गाचे काम करत आहे. स्थानिकांच्या मागण्या आणि भावना यांचा आदर न करता महामार्गाचे काम करणे, प्राचीन जगदंबा मंदिर जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार राष्ट्रीय महामार्गासाठी तातडीने नवीन आराखडा सिद्ध करणे या मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने जागरण आंदोलन करण्यात आले.

पोखरापूर गावाजवळची सलग ७ अपघाती वळणे दूर करावीत. नैसर्गिक प्रवाहामध्ये अवैधरित्या पालट करून चुकीच्या पद्धतीने बांधलेला पूल दुरुस्त करावा. या मागणीसाठीही ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावा करत आहेत. ग्रामस्थांच्या वतीने वरील सर्व मागण्यांचे निवेदन पुणे विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल ‌‌यांना देण्यात आले.

संपादकीय भूमिका 

प्राचीन मंदिर, वास्तू जतन करण्याचे दायित्व पुरातत्व विभागाचे असतांना यासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणे लज्जास्पद !