‘अजिनोमोटो’मुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यांचा धोका – संशोधन

चायनीज अन्नपदार्थ, तसेच ‘मंचुरियन’, ‘मोमोज’ आणि ‘स्प्रिंग रोल’ यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – चायनीज अन्नपदार्थ, तसेच ‘मंचुरियन’, ‘मोमोज’ आणि ‘स्प्रिंग रोल’ यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये ‘अजिनोमोटो’ नावाचे रासायनिक मीठ टाकल्याने या पदार्थांची चव आणखी चांगली होते. असे असले, तरी ते खाल्ल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. अलाहाबाद विश्‍वविद्यालयाच्या बायोकेमिस्ट्री (जैवरसायनशास्त्र) विभागाच्या संशोधकांच्या मते, ‘हे पदार्थ खाल्ल्याने लोकांमध्ये हृदयविकार, तसेच उच्च रक्तदाब यांसारख्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.’ याआधीच्या अनेक संशोधनांमध्येही हा पदार्थ आरोग्यासाठी हानीनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आजकाल मुलांच्या आहारात ‘जंक फूड’ आणि ‘अजिनोमोटो’ समृद्ध असलेल्या अन्य खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

‘अजिनोमोटो’ (एम्.एस्.जी.) मुळे होणारी हानी !

अलाहाबाद विद्यापिठाचे हे संशोधन ‘इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्री’मध्ये प्रकाशित झाले आहे. यामध्ये शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की…
१. ‘एम्.एस्.जी.’चा अल्प डोसही आरोग्यास हानी पोचवू शकतो. निर्धारित डोस घेतल्यानंतरही तणाव आणि जळजळ यांसारख्या समस्यांचा धोका असतो.
 २. उच्च रक्तदाब, हृदयविकार, तसेच लवकर वृद्धत्वाच्या समस्या निर्माण होतात.
 ३. मुलांसाठी अत्यंत धोकादायक असून अत्यल्प वेळात ते व्यसनाधीन होतात.
 ४. लहान मुलांमध्ये आणि वाढत्या गर्भामध्ये रक्त-मेंदूच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

 ‘अजिनोमोटो’ म्हणजे काय ?

‘अजिनोमोटो’ हे एक प्रकारचे रासायनिक मीठ आहे. त्याचे रासायनिक नाव ‘मोनोसोडियम ग्लूटमेट’ (एम्.एस्.जी.) आहे. वर्ष १९०९ मध्ये ‘ब्रँड’ म्हणून त्याचे व्यावसायिकीकरण करण्यात आले. टोमॅटो आणि चीज यांच्यामध्ये ते नैसर्गिकरित्या असते.

संपादकीय भूमिका

पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाचे दुष्परिणाम जाणा !