ब्रिटनच्या राणीच्या निधनाला भारतातील प्रसारमाध्यमे, राजकारणी, चित्रपट कलाकार यांनी दिलेले अनावश्यक महत्त्व, यातून आजही आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत मानसिकदृष्ट्या अडकलो आहोत, हे लक्षात येते. याचाच वेध घेणारा हा लेख !
१. भाषा
१ अ. मातृभाषेत बोलणार्यांना दर्जा न्यून, तर इंग्रजी भाषा येणार्यांना मान दिला जाणे : सर्वप्रथम आपण भाषेचा विचार करू. संभाषण करतांना अधिक प्रमाणात इंग्रजी भाषा वापरली जाते. भारतात सध्या २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत की, ज्यामध्ये प्रत्येक राज्यात २ भारतीय भाषा आहेत. भारतात १९ सहस्र ५६९ मातृभाषा असून यांपैकी १२१ भाषा १० सहस्रांहून अधिक वेळा बोलल्या जातात. भारतात अधिकृत अशा २२ भाषा आहेत. या सर्व भाषा असतांना स्वतंत्र भारतात एकाच भाषेत प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. ती म्हणजे आपल्यावर आक्रमण करणार्या इंग्रजांची इंग्रजी भाषा ! भारताचा स्वातंत्र्यलढा ‘आमची स्वतःची ओळख व्हावी’, यासाठी होता. आमच्या मातृभाषेवरून आमची स्वतंत्र ओळख अधिक प्रमाणात होऊ शकते. जर भारत स्वतंत्र झाला आहे, तर आम्ही आमच्या मातृभाषेचा प्रसार का करत नाही ? आम्हाला आमच्या भारतीय भाषा वापरण्यास लाज का वाटते ? जर एखादा हिंदी, तमिळ, उडिया, आसामी, बंगाली वगैरे बोलत असेल, तर ते मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. या भाषा बोलणार्याला न्यून दर्जा दिला जातो; परंतु तोच माणूस इंग्रजीत बोलत असेल, तर त्याला मान्यता मिळते.
१ आ. मातृभाषेत शिक्षण घेणार्या मुलांची अधिक प्रगती झाल्याचे संशोधनातून लक्षात येणे : आपल्यावर राज्य करणार्यांच्या भाषेला आज प्राधान्य दिले जात आहे. भारतात इंग्रजी ही सामाजिक आणि आर्थिक स्तरावर वापरली जात आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर इंग्रजी भाषा येणे अत्यावश्यक आहे. बहुतांश पालक त्यांच्या पाल्याला अस्खलित इंग्रजी बोलायला यावे, या संकल्पनेने भारित झालेले दिसून येतात. त्यांची धारणा आहे की, इंग्रजी भाषेत परिपूर्णता आली, तर इतर विषयांत अधिक गुण मिळू शकतात; परंतु ती धारणा चुकीची आहे. खरे म्हणजे मातृभाषेत परिपूर्णता आली, तर इतर विषयांत अधिक गुण मिळू शकतात. वर्ष १९७३ मध्ये एका संशोधकाने अभ्यास केला की, अमेरिकेत मेक्सिको येथे रहाणारे ज्या मूळ अमेरिकन नागरिकांनी त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण घेतले आणि त्यानंतर स्पॅनिश भाषेतून शिक्षण घेतले, त्यांची कामगिरी मातृभाषेतून शिक्षण न घेता थेट स्पॅनिश भाषेतून शिकणार्यांपेक्षा अधिक चांगली होती. होंड्युरस, इराण आणि टोगो या देशांमध्येही अशाच प्रकारचे संशोधन करण्यात आले. त्यामध्ये जेव्हा मुलांना ते घरी बोलत असलेल्या भाषेत शिकवले जाते, तेव्हा त्यांना परीक्षांमध्ये अधिक गुण प्राप्त होतात, असे आढळून आले. ‘इंग्रजी भाषा म्हणजे यश’, असे समीकरण झाले आहे. ‘जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर इंग्रजी आलेच पाहिजे’, असे अनेक जणांना वाटते. सध्या जपान, जर्मनी आणि चीन हे देश आर्थिक क्षेत्रात जगातील पहिल्या ५ क्रमांकांमध्ये आहेत. या देशातील बहुतांश लोक इंग्रजी बोलत नाहीत.
२. इतिहास
२ अ. ब्रिटिशांनी शिक्षणाच्या माध्यमातून आक्रमकांविषयी चुकीचा इतिहास शिकवणे : जो इतिहास भारतातील शाळांमध्ये शिकवला जातो, तो भारताचा इतिहासच नव्हे. तो भारताचा इतिहास ब्रिटिशांच्या दृष्टीतून सिद्ध केलेला आहे. ब्रिटिशांनी भारताची अवनती करण्यासाठी साधन म्हणून इतिहासाचा उपयोग केला. वर्ष १८६८ मध्ये साहित्य, इतिहास आणि तत्त्वज्ञानाचे प्रसिद्ध अभ्यासक मॅक्समुल्लर यांनी ‘ड्युक ऑफ आर्गाय’ यांना एक पत्र लिहिले. तो तेव्हा भारताचा सचिव होता. मॅक्समुल्लर त्या पत्रात म्हणतो, ‘‘भारतावर एकदा विजय मिळवला आहे; परंतु त्याच्यावर शिक्षणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विजय मिळवला पाहिजे.’’ ब्रिटिशांनी त्यांच्या दृष्टीने सोयीचा होईल, असा इतिहास लिहिला. त्यांनी लिहिले की, ॲलेक्झांडरने भारतावर आक्रमण करून विजय मिळवल्यानंतर देशामध्ये सुधारणा झाली. ‘शक आणि कुशाण हे भारतियांसाठी चांगले राज्यकर्ते होते. भारतावर आक्रमण करणारे महंमद घोरी, तुघलक आणि अकबर हे चांगले राज्यकर्ते होते. अकबर हा पुष्कळ चांगला राजा होता’, असा इतिहास लिहिला गेला. राजा मानसिंह हा अकबराच्या सैन्यातील सरदार होता. त्याने पराक्रमाच्या जोरावर अकबराला साम्राज्य वाढवण्यास साहाय्य केले. आम्हाला राजा मानसिंह यांचा इतिहास का शिकवला गेला नाही ? कारण ते भारतीय होते. त्यामुळे त्यांची प्रसिद्धी करणे, हे ब्रिटिशांना योग्य वाटले नाही. आपल्या इतिहासाच्या पुस्तकात अजूनही निवडक असेच लिखाण घेतले जात आहे.
२ आ. भारतीय पुस्तकांमध्ये ब्रिटीश विचारसरणीचा प्रभाव असल्याने देशाचा प्राचीन खरा इतिहास शिकवला न जाणे : आमच्या पुस्तकांमध्ये न्यूटनविषयी लिहिले जाते; परंतु ब्रह्मगुप्त या सहाव्या शतकातील प्रसिद्ध गणिततज्ञाविषयी काहीच लिहिले जात नाही. त्याने १ ते ९ हे अंक आणि शून्याचा शोध लावला, हे भारतियांना शिकवले जात नाही. आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जगावर प्रभाव टाकणार्या वैदिक गणिताविषयी लिहिले जात नाही. भारतातील शेतीच्या पद्धती सर्व जगाने कशा आत्मसात केल्या ? प्राचीन भारत हा एक उत्कृष्ट व्यापार करणारा देश होता, भारतीय संस्कृतीचा आशियातील काही भागांवर असलेला प्रभाव यांविषयी सांगितले जात नाही, तसेच भारतातील इतिहासाच्या पुस्तकातून अहोमच्या साम्राज्याविषयी उल्लेख नाही. त्यांनी आसाममध्ये ६०० वर्षे राज्य केले आणि ब्रिटिशांचाही पराभव केला होता. आपल्या पुस्तकात चोला आणि पांड्या यांना काही प्रमाणात प्रसिद्धी दिली जाते.
आपली पाठ्यपुस्तके अजूनही ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झालेली नाहीत. भारताचाच इतिहास नव्हे, तर जगाचा इतिहासही ब्रिटिशांच्या बाजूने लिहून पक्षपातीपणा केलेला आहे, उदा. इतिहासामध्ये ब्रिटीश आणि अमेरिकन सैन्य यांचा उल्लेख येतो. जे भारतीय ब्रिटीश सैन्यामधून लढले त्यांचा इतिहास कुठे आहे ? दुसर्या महायुद्धात पालट घडवून आणणारी घटना म्हणजे रशियामध्ये नाझी सैन्याचा झालेला पराभव. ब्रिटीश हा इतिहास विद्यार्थ्यांपासून लपवू इच्छितात; पण आपण हा इतिहास का लपवावा ? भारतावर अजूनही ब्रिटिशांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे.
३. विविध भारतीय संस्थांवर असलेला ब्रिटीश विचारसरणीचा प्रभाव मोडून काढणे आवश्यक !
तिसरे सूत्र म्हणजे भारतातील संस्थांवरही ब्रिटीश विचारसरणीचा प्रभाव आहे. भारताच्या संसदेत विधेयक संमत करतांना अजूनही मत विचारण्यासाठी ‘आय’ आणि ‘नो’ यांचा वापर केला जातो. लोकसभेतील सभापती आणि राज्यसभेचे अध्यक्ष यांच्यामागे आपण शिपाई उभा असल्याचे पहातो. भारतात अजूनही न्यायाधिशांना ‘माय लॉर्ड’, ‘युवर ऑनर’ असे संबोधले जाते. आपली सर्व न्याययंत्रणा ब्रिटीश पद्धतीवर आधारित आहे. भारतीय सैन्यात ‘सेवादार’ आणि ‘साहाय्यक’ या शब्दांचा वापर करण्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात चर्चा होते. ब्रिटिशांनी धर्म आणि पारंपरिक समूह यांच्यामध्ये फूट पाडली. भारतात अजूनही त्याचे स्वागत केले जात आहे. अजूनही आपण ब्रिटीश शिक्षणपद्धतीचे अनुकरण करत आहोत. आपण आपल्या मुलांना नवीन संशोधन करण्याचे स्वातंत्र्य देत नाही. ते ब्रिटीश शिक्षणपद्धतीचे गुलाम झाले आहेत. ‘स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्ता परिवर्तन’, असे होत नाही. आम्हाला आमच्या पद्धती निवडता येत नाहीत, तर आपण आपल्याला स्वतंत्र कसे म्हणू शकतो ?
अजूनही भारतीय सैन्यामध्ये महिलांना योग्य स्थान नाही. अनेक भारतियांना भारतीय पोशाख आवडत नाहीत. विद्यापिठांच्या पदवीदान समारंभात अजूनही काळा झगा वापरला जातो. आपल्या पोलीस खात्यात अजूनही ‘लाठीचार्ज’ हा शब्द वापरला जातो. सामाजिक स्तरावर अजूनही इंग्रजीला प्राधान्य दिले जाते. आपल्याला इंग्रजीतून लिखाण करणारे काँग्रेसचे नेते शशी थरूर आवडतात; परंतु आपण आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवण्याविषयी मात्र प्रश्न उपस्थित करतो. आपल्या इंग्लंडमधील राजघराण्याविषयी अधिक माहिती आहे; परंतु आपल्याला सातवाहनसारख्या राजांविषयी काहीही माहिती नाही. भारताने प्रगती केली आहे, हे निश्चित; परंतु भारतियांनी ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्याची अजूनही आवश्यकता आहे.
– पल्की शर्मा उपाध्याय, माजी वृत्तनिवेदिका आणि पत्रकार
(साभार : ‘WIONews’ वृत्तवाहिनी)
ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या खुणा हटवण्यासाठी शिक्षणापासून ते न्यायव्यवस्थेपर्यंत सर्वच गोष्टींचे भारतीयीकरण होणे आवश्यक ! – संपादक |