पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले महान कार्य !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेत केलेले भाषण येथे दिले आहे.

१. भारताची तत्त्वज्ञ राणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान केवळ महाराष्ट्र पातळीवर नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे असे आहे. त्यांनी आक्रमकांनी तोडफोड केलेली मंदिरे, पवित्र तीर्थस्थाने यांचा जीर्णोद्धार केला. घाट आणि धर्मशाळा उभारल्या. एक न्यायप्रिय आणि कर्तबगार महिला शासक म्हणून त्यांना सदैव आदराचे स्थान आहे आणि यापुढेही राहील. जागतिक स्तरावरही अनेक इतिहासकार आणि लेखक यांनी त्यांच्या कार्याची नोंद घेतलेली दिसून येते. लेखक जॉन की आणि लॉर्ड थॉमस लॉरेन्स यांनी त्यांचे प्रशासन कौशल्य आणि न्यायप्रियतेचे कौतुक करत त्यांना ‘Philosopher Queen of India, just as Elizabeth (I) was in England’, (भारताची तत्त्वज्ञ राणी, जशी इंग्लंडमध्ये एलिझाबेथ (प्रथम) होती तशी) असे संबोधत गौरव केला आहे.

प्रा. राम शिंदे

२. ‘भिलकवडी’चा प्रयोग

त्यांची सुशासनाची संकल्पना आणि ‘भिलकवडी’चा प्रयोग मोठा विलक्षण आहे. त्याकाळी यात्रेकरू, वाटसरू यांना जंगलातून मार्गक्रमण करत असतांना भिल्लांकडून लुटले जायचे. याविषयीच्या तक्रारी त्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या समस्येच्या मुळाशी जाऊन असे समाधान शोधले की, यात्रेकरू आणि वाटसरू यांना सुरक्षित प्रवासाची हमीही मिळाली आणि भिल्लांना रोजगार अन् उपजीविकेचे साधनही मिळाले. भिल्लांना दरबारात उभे करून, त्यांना विश्वासात घेत यात्रेकरू आणि वाटसरू यांना सुरक्षा पुरवून पुढे नेण्याचे दायित्व त्यांच्यावरच देण्यात आले. यासाठी यात्रेकरू, वाटसरू यांच्याकडून नाममात्र एक कवडी शुल्क आकारण्यास त्यांनी अनुमती दिली. इतिहासात ‘भिलकवडी’ म्हणून त्याची नोंद झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संवेदनशील प्रशासन नैपुण्याचे की, आपण ज्याला आधुनिक काळात ‘सुशासन’ म्हणतो, त्याचे ते महत्त्वाचे उदाहरण आहे.

३. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य

अ. सैन्यामध्ये महिलांच्या तुकडीची निर्मिती

आ. शेतकर्‍यांना करमाफी आणि तलाव, विहिरींच्या माध्यमातून सिंचन सुविधा, भूमापन.

इ. गोपालनासाठी साहाय्य

ई. दुर्मिळ ग्रंथांची हस्तलिखिते सिद्ध करून त्यांचे जतन, विद्याप्रसार आणि ज्ञानदान यांसाठी साहाय्य

उ. संस्कृत पाठशाळा

ऊ. गोरगरिबांसाठी अन्नछत्र उभारणी

ए. सतीप्रथेला विरोध आणि संपत्तीमध्ये स्त्रियांना अधिकार

ऐ. पर्यावरण रक्षण आणि संतुलन या दृष्टीनेही त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांनी पशूंना चरण्यासाठी राखीव कुरणे, शेतभूमी यांची व्यवस्था केली. मुख्य प्रवाहापासून नागरी वापरासाठी पाणी मिळावे, यासाठी पाण्याचा वेगळा प्रवाह निर्माण केला. शेतकर्‍यांनी २० झाडे लावणे बंधनकारक केले, तसेच विनाअनुमती झाड तोडल्यास मोठी शिक्षा केली जात होती.

ओ. त्यांनी बांधलेले घाट, बारव, विहिरी, कुंड आणि मंदिरे हे आज ३०० वर्षांनंतरही सुस्थितीत आहेत. वनसंरक्षण आणि वनसंवर्धन या दृष्टीने अतिशय पूरक असे धोरण त्यांनी राबवले. रस्त्याच्या दुतर्फा, ओसाड भूमी, डोंगर याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिले.

औ. सतत मोहिमेवर असलेले मल्हारराव होळकर यांच्याकडून त्यांना प्राप्त झालेले मार्गदर्शन, पत्रव्यवहार या आधारे माळवा राज्यात अद्ययावत् तोफखाना आणि दारूगोळा निर्मितीसाठी त्यांनी स्वत: भेटी देऊन जागा निश्चित केली, कुशल कारागिरांची नेमणूक केली. इतकेच नव्हे, तर कारागिरांना त्यांच्या कामाचा उचित मोबदला मिळेल, या दृष्टीने जातीने लक्ष पुरवले. शस्त्र आणि शास्त्र अशा दोन्ही विषयांत त्या पारंगत होत्या.

अं. ‘शेतकरी आणि रयत (जनता), म्हणजे आपल्या राज्याचा आत्मा होय, त्यांना जपले पाहिजे, जगवले पाहिजे’,या संवेदनशीलतेने त्यांनी राज्यकारभार केला. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल, काही कारणाने पीक निघाले नसेल, तर शेतसारा माफ करण्याचा निर्णय त्या घेत.

४. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली प्रतिज्ञा

महेश्वर येथील त्यांच्या राजवाड्यावर त्यांनी केलेली प्रतिज्ञा लिहिलेली आहे. ही प्रतिज्ञा म्हणजे एका महाराणीने लोककल्याणकारी राज्याचा जनतेच्या पुढ्यात मांडलेला १८ व्या शतकातील वचननामाच आहे, ज्याची पूर्तता त्यांनी त्यांच्या पुढील कारकीर्दीत कसोशीने केली. ती प्रतिज्ञा आपण सर्व लोकप्रतिनिधींनीही वाचली पाहिजे आणि आत्मसात् केली पाहिजे.

त्या प्रतिज्ञेतील सूत्रे :

अ. माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.

आ. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वत: उत्तरदायी आहे.

इ. सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे काही काम करत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे द्यायचे आहे.

ई. परमेश्वराने जे जे दायित्व माझ्यावर सोपवले आहे, ते मला पार पाडायचे आहे.

सर्वांत उल्लेखनीय, म्हणजे अतुलनीय कार्य करूनही आपला नामोल्लेख न करता पूर्णत्वास गेलेल्या प्रत्येक वास्तूवर किंवा पूर्ण झालेल्या कामावर ‘श्री शंकर आज्ञेवरून’ अशी मोहोर उमटवण्यात येत असे. मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व अशा चारही कसोट्यांवर माता अहिल्यादेवींचे कार्य असामान्य असून पुढील अनेक पिढ्यांना ते प्रेरणा देत राहील.


दूरदृष्टीच्या मुत्सद्दी राज्यकर्त्या आणि प्रजाहितदक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर !

अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे ३१ मे १७२५ या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला. ईश्वराविषयीची निष्ठा आणि सामाजिक समतेचा संस्कार, बालपणी त्यांच्यावर आई-वडिलांनी, म्हणजे चौडीगावचे पाटील शिवभक्त माणकोजी आणि सुशीलाबाई यांनी बिंबवला. प्रज्ञावंत आणि मूलतःच धैर्यवान असलेल्या अहिल्याबाई शिंदे या वयाच्या ८ व्या वर्षी आहिल्यादेवी खंडेराव होळकर बनल्या. पराक्रमी सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांच्यातील गुणांना प्रोत्साहन दिले. पती खंडेराव होळकर यांना वीरमरण आले. मल्हाररावांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. त्यानंतरचे त्यांचे जीवनकार्य, म्हणजे प्रजाहित ! महाराणी असूनही वैराग्यभाव, इंग्रजांचा धोका वेळीच ओळखणार्‍या दूरदृष्टीच्या मुत्सद्दी राज्यकर्त्या, महिलांची सैन्य तुकडी निर्माण करणार्‍या महान योद्ध्या, न्यायप्रिय शासक अशा अनेक गुणवैशिष्ट्यांचा प्रेरक इतिहास आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शासनकाळ म्हणजे शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता यांचे युग होते. जानेवारी १७६१ मध्ये अहमदशहा अब्दालीशी झालेला पानिपतचा भीषण रणसंग्राम हा मराठ्यांच्या इतिहासाला वेगळे वळण देऊन गेला. पानिपतावरून येणार्‍या प्रतिकूल बातम्या अहिल्यादेवींवर विजेसारख्या कोसळत असतांनाही त्या डगमगल्या नाहीत. पानिपत युद्धाच्या कठीण काळात अखंड अन्नछत्र आणि आरोग्यसेवा पुरवून त्यांनी साहाय्यकार्य चालूच ठेवले.
– प्रा. राम शिंदे