ज्ञानशक्तीच्या आधारे हिंदूंचे प्रभावी संघटन करूया ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी तीन दिवसांच्या नेतृत्व विकास कार्यशाळांचे आयोजन !

कोल्हापूर – योग्य नियोजनकौशल्य आणि निर्णयक्षमता या गुणांच्या आधारे खर्‍या अर्थाने ‘नेतृत्व विकास’ साधता येतो. त्यामुळे प्रत्येकाने हे गुण स्वत:मध्ये आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमांच्या माध्यमातून आदर्श हिंदूसंघटन उभारू शकतो. ग्रंथ हे संघटनाचे कार्य करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ग्रंथ लिखाणाच्या माध्यमातून ज्ञानशक्तीचे भांडार उपलब्ध करून दिले आहे. त्या ज्ञानाच्या आधारे हिंदूंचे प्रभावी संघटन करूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या ३ ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी तीन दिवसीय ‘नेतृत्व विकास कार्यशाळां’चे आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही कार्यशाळांना श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनाही या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कोल्हापूर येथील कार्यशाळेला सनातनच्या पू. (डॉ.) श्रीमती शरदिनी कोरे यांची, तर सोलापूर येथे सनातनच्या पू. (कु.) दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती होती. पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर येथील कार्यशाळांमध्ये समितीचे अनुक्रमे ७०, ८० आणि ८० कार्यकर्ते अन् धर्मप्रेमी यांनी सहभाग घेतला.

श्री. शिंदे पुढे म्हणाले, ‘‘आपल्याला जागृत हिंदूंचे संघटन करायचे आहे. हिंदूसंघटनासाठी ‘एकल कार्यकर्ता-सकल अभियान’च्या माध्यमातून एकटा कार्यकर्ता अनेक उपक्रम प्रभावीपणे राबवू शकतो. यासाठी सिद्ध व्हायचे आहे.’’

कार्यशाळांमधील विषय आणि प्रायोगिक भाग !

या तिन्ही कार्यशाळांमध्ये नियोजनक्षमतेचा विकास, गुणसंवर्धन, आदर्श संपर्क कसा करावा ?, माहिती अधिकाराचा वापर कसा करावा ?, उपक्रमांची वृत्ते कशी करावीत ? यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन आणि प्रायोगिक भाग घेण्यात आले. या कार्यशाळेत आंदोलन करण्यामागील उद्देश, आंदोलनाचे प्रकार, विशेष आंदोलन, हिंदु राष्ट्राविषयी आक्षेप आणि खंडण, हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांविषयीची नीती, कार्यपद्धत आणि दिशा इत्यादी महत्त्वांच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

________________________________

या कार्यशाळांतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि क्षणचित्रे वाचण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या https://sanatanprabhat.org/marathi/611024.html

____________________