सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या फोंडा (गोवा) येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनिता कोनेकर (वय ७१ वर्षे) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘आश्रमात सोडण्यासाठी साधिकेच्या यजमानांच्या माध्यमातून श्रीकृष्ण रथ घेऊन आला आहे’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे

श्रीमती अनिता कोनेकर

‘एकदा मी सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले. तेव्हा एक साधिका माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली, ‘‘माझे यजमान तुम्हाला गाडीवरून आश्रमात पोचवतील.’’ मी तिच्या यजमानांना म्हणाले, ‘‘बघा, श्रीकृष्ण माझ्यासाठी रथ घेऊन आला आणि तो मला आश्रमात घेऊन जात आहे.’’ त्या वेळी मी साधिकेच्या यजमानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

२. ‘आश्रमातील साधिकांच्या माध्यमातून गुरुमाऊली सांभाळ करत आहे’, असे जाणवणे 

मी रामनाथी आश्रमात धान्य निवडण्याची सेवा करते. तेथील उत्तरदायी साधिका मला सेवा देते. ‘मला डोळ्यांचा त्रास आहे’, हे तिला ठाऊक आहे. मी तिला सेवा करण्याविषयी विचारल्यावर त्याचा विचार करूनच ती मला सेवा देते. ती मला सांगते, ‘‘तुम्ही जमेल तेवढीच सेवा करा.’’ सहसाधिकाही ‘माई, तुम्हाला जमेल तेवढीच सेवा करा’, असे मला सांगतात. त्या वेळी ‘माझी गुरुमाऊली माझ्या समवेत सतत सावलीप्रमाणे आहे. ती मला साहाय्य करत आहे आणि माझा सांभाळ करत आहे’, असे मला जाणवते.

३. ‘कुटुंबियांच्या माध्यमातून देवच साहाय्य करत आहे’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे

घरातही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच साधक आहेत. मला त्यांच्याकडून घरकामात साहाय्य झाल्यास माझ्या मनात भाव दाटून येतो. ‘बघ देवा, तू साहाय्य केलेस; म्हणून हे काम पूर्ण झाले’, असे वाटून माझी गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता व्यक्त होते.

४. कृतज्ञता

गुरुमाऊली मला आनंदी ठेवते. त्यामुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला कसलीच काळजी वाटत नाही. त्या आनंदात ‘दिवस कधी उजाडतो आणि कधी मावळतो ?’, हेही मला कळत नाही. ‘हे गुरुमाऊली, ‘तुला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न माझ्याकडून होत नसतांना तूच मला हात धरून पुढे पुढे नेत आहेस’, याबद्दल मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती अनिता कोनेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७१ वर्षे), फोंडा, गोवा. (२७.१२.२०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक