काँग्रेसने सामाजिक माध्यमांवरील पोस्टवर रा.स्व. संघाची खाकी चड्डी जळतांना दाखवली !

रा.स्व. संघ आणि भाजप यांची काँग्रेसवर टीका !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा चालू असतांना काँग्रेसने तिच्या ट्विटर खात्यावर एक पोस्ट केल्याने वाद निर्माण झाला आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी चड्डीचे छायाचित्र असून त्याला एका कोपर्‍यात आग लागली आहे, असे दिसत आहे. यावर चित्रावर लिहिले आहे ‘देशाला द्वेषाच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी आणि भाजप अन् संघ यांनी केलेली हानी भरून काढण्यासाठी आम्ही हळूहळू आमच्या उद्दिष्टाकडे पोचत आहोत. देशाला संघाच्या द्वेषातून मुक्त करण्यासाठी केवळ १४५ दिवस शिल्लक राहिले आहेत.’ पुढील १४५ दिवस भारत जोडो यात्रा चालू रहाणार आहे.

काँग्रेसच्या बापजाद्यांनी संघाचा पुष्कळ तिरस्कार करूनही संघ वाढत चालला आहे !  – रा.स्व. संघ

संघाचे सह कार्यवाहक डॉ. मनमोहन वैद्य

काँग्रेसच्या या पोस्टवर रा.स्व. संघाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघाचे सह कार्यवाहक डॉ. मनमोहन वैद्य यांनी म्हटले आहे, ‘‘ते लोकांना द्वेषातून जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या बापजाद्यांनीही संघाचा पुष्कळ तिरस्कार केला. पूर्ण शक्तीने संघाला रोखण्याचा प्रयत्न केला; पण संघ थांबला नाही. त्याची सातत्याने वाढ होत आहे.’’

काँग्रेसने वर्ष १९८४ मध्ये देहली पेटवली ! – खासदार तेजस्वी सूर्या

खासदार तेजस्वी सूर्या

दक्षिण बेंगळुरूचे भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले, ‘‘काँग्रेसने वर्ष १९८४ मध्ये देहली पेटवली. काँग्रेसच्या विद्वेषी मानसिकतेतून निपजलेल्यांनी वर्ष २००२ मध्ये गोध्रा येथे कारसेवकांना जिवंत जाळले. आज पुन्हा एकदा काँग्रेसवाल्यांनी हिंसाचाराचे आवाहन केले आहे. राहुल गांधी भारत सरकारच्या विरोधात लढत आहेत. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस घटनात्मक पद्धतीवर विश्‍वास नसलेला पक्ष बनला आहे.’’

संपादकीय भूमिका

दोन पक्ष अथवा संघटना यांच्यामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र काँग्रेस किती खालच्या थराला जाऊन हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा द्वेष करते, हे यातून दिसून येते. असा पक्ष जनहित काय साधणार ?