घरी करत असलेल्या नामजपापेक्षा आश्रमात असतांना करत असलेला नामजप अधिक गुणात्मक होत असल्याविषयी आलेली अनुभूती

घरी करत असलेल्या नामजपापेक्षा रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात वास्तव्यास असतांना तेथे करत असलेला नामजप अधिक गुणात्मक होत असल्याविषयी साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘मला मागील ८ ते १० वर्षांपासून प्रतिदिन पहाटे ४ ते ५.३० या कालावधीत नामजप करण्याची सवय आहे. मी घरी असतांना केलेल्या नामजपाची गुणवत्ता आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतांना २३ दिवसांमध्ये केलेल्या नामजपाची गुणवत्ता यांतील भेद पुढे दिला आहे.

श्री. अनंत येळेगांवकर

१. नामजपाची गुणवत्ता

१ अ. घरी असतांना मी दीड घंटे नामजप केल्यानंतर अनुमाने २० ते २५ मिनिटेच माझा गुणात्मक नामजप होऊन ‘माझा अर्धा घंटाच नामजप झाला आहे’, असे मला वाटते.

१ आ. रामनाथी आश्रमात कुठेही बसून नामजप केल्यावर समाधान मिळणे आणि लवकर ध्यान लागणे : रामनाथी आश्रमात कुठेही बसून नामजप केल्यानंतर मला पूर्ण समाधान मिळते. मी नामजप चालू केल्यानंतर पहिल्या ५ ते १० मिनिटांतच माझे ध्यान लागते. अधूनमधून ध्यानातून जाग आल्यानंतर मला डोळे भरून निळा प्रकाश दिसतो आणि तो हळूहळू लहान होऊन बिंदूरूप होऊन नाहीसा होतो. हीच प्रक्रिया सातत्याने चालू असते.

२. आज्ञाचक्रावर स्पंदने जाणवणे

२ अ. घरी नामजपाला आरंभ केल्यानंतर २० ते २५ मिनिटांनी माझ्या आज्ञाचक्रावर स्पंदने जाणवतात.

२ आ. आश्रमात दिवसभरात कधीही नामजपास बसल्यानंतर नामजपापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करत असतांनाच आज्ञाचक्र जागृत झाल्याची अनुभूती येते. मला आज्ञाचक्रावर अतिशय आनंददायक स्पंदने जाणवतात.

३. सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवणे

३ अ. घरी नामजप करतांना २ – ३ दिवसांतून कधीतरी १ – २ वेळा सहस्रारचक्र जागृत झाल्याची मला अनुभूती येते.

३ आ. रामनाथी आश्रमात नामजप चालू केल्यानंतर ५ ते १० मिनिटांनीच मला सहस्रारचक्रावर स्पंदने जाणवण्यास आरंभ होतो.

४. नामजपाचा कालावधी

४ अ. घरी असतांना मी सकाळी अंघोळ झाल्यानंतर आणि संध्याकाळी नामजप करतो, तरीही ‘माझा नामजप पूर्ण झाला आहे’, असे आठवड्यातून २ – ३ वेळाच मला वाटते.

४ आ. आश्रमात आल्यापासून ‘पहाटे ५ – ५.१५ वाजताच नामजप पूर्ण झाला आहे’, असे मला वाटते. दिवसभर अन्य सेवेत असतांनाही माझा नामजप होतो.

‘नामजपामधील खरा आनंद काय आहे !’, हे मी शब्दांत सांगू शकत नाही. मला रामनाथी आश्रमातील वास्तव्यात अवर्णनीय आनंद अनुभवता आला.’

– श्री. अनंत बलभीम येळेगांवकर, बार्शी, सोलापूर. (१८.१२.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक