चेन्नई येथील ख्रिस्त्यांच्या शाळेच्या वसतीगृहातील हिंदु विद्यार्थिनींचा धर्मांतरासाठी छळ !

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या पहाणीत उघड !

चेन्नई (तमिळनाडू) – येथील रोयापेट्टा भागात असणार्‍या सी.एस्.आय. मोनहन् गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल या शाळेच्या वसतीगृहाची पहाणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या राज्य शाखेने केली. या वेळी वसतीगृहातील विद्यार्थिनींनी, ‘आमच्यावर ख्रिस्ती परंपरांचा पालन करण्यासाठी दबाव टाकला जात आहे’, असा आरोप केला. यानंतर या प्रकरणी चौकशी केली जात आहे. या वसतीगृहाची माहिती मिळाल्यानंतर आता आयोगाचे पथक राज्यातील अन्य शाळांच्या वसतीगृहांचीही पडताळणी करत आहेत.

या प्रकरणी या विद्यार्थिनींनी लेखी तक्रार आयोगाकडे दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांना मारहाण करण्यासह त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे. वसतीगृहाच्या प्रमुख त्यांना शिवीगाळ करण्यासाठी त्यांना बांधून ठेवून त्यांना धर्मांतरासाठी बाध्य केले जात आहे.

विद्यार्थिनींना फूल माळण्यास आणि कुंकू लावण्यास बंदी

या वसतीगृहामध्ये गरीब परिवारातील हिंदु विद्यार्थीनी रहात आहेत. त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. विशेष म्हणजे या वसतीगृहाची नोंदणीच करण्यात आलेली नाही. तसेच विद्यार्थिनींना कोणतीही सुविधा मिळत नसल्याचेही लक्षात आले. सर्वत्र अस्वच्छता होती. सभागृहात झोपण्यासाठी ज्या गाद्या होत्या त्याही अस्वच्छ होत्या. प्रत्येक पलंगावर बायबल ठेवण्यात आले होते. तसेच भिंतींवर येशूची चित्रे होती. विद्यार्थिनींना केसात फूल माळण्यास आणि कपाळावर कुंकू लावण्यास आणि कानातले घालण्यास बंदी घातली होती. जेव्हा आयोगाचे अधिकारी पोचले तेव्हा त्या रडू लागल्या होत्या.

संपादकीय भूमिका

देशातील ख्रिस्त्यांच्या शाळेत बहुतेक वेळा अशा प्रकारचा छळ केला जात असल्याच्या घटना समोर येऊनही संबंधित राज्य सरकार याविषयी ठोस काही करतांना दिसत नाहीत. किमान भाजप शासित राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारने या संदर्भात हिंदूंचे रक्षण होण्यासाठी आणि अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्णय घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

शाळेवर कारवाई करण्याच्या मागणीवर द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) सरकार निष्क्रीय !

आयोगाने याविषयी तमिळनाडूचे मुख्य सचिव व्ही. इराई अंबू आणि पोलीस महासंचालक सिलेंद्र बाबू यांना पत्र लिहून ‘या वसतीगृहात विद्यार्थिनींवर बलपूर्वक ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याने शाळेवर कारवाई करण्यात यावी’, अशी सूचना केली आहे, तसेच आयोगाने या वसतीगृहातून विद्यार्थिनींना बाहेर काढण्याचाही आग्रह केला; मात्र सरकारने यावर काहीही कृती केली  नाही.

यावर्षी जानेवारी मासामध्ये तमिळनाडूच्याच एका ख्रिस्ती शाळेच्या वसतीगृहात लावण्या नामक हिंदु तरुणीने तिच्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास दबाव टाकला जात असल्याने आत्महत्या केली होती.

संपादकीय भूमिका

स्वतःला नास्तिकतावादी म्हणवून घेणारे द्रमुक सरकार नास्तिक नसून ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करणारे आणि हिंदुद्वेषी सरकार आहे, हेच यातून लक्षात येते !