‘तुमच्या सरकारने याकुब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण केले’, असे विचारताच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले !

पुणे – मुंबई बाँबस्फोटातील आतंकवादी याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुणे येथे प्रसारमाध्यमांनी धारेवर धरले. पत्रकारांनी तुमच्या सरकारमध्ये सुशोभीकरण झाल्याचे विचारल्यावर पवार म्हणाले, ‘कुणाचेही सरकार असू द्या, तू मुख्यमंत्री असता, तर तुझ्या काळातही व्हायला नको होते’, असे संतापजनक उत्तर दिले.

अजित पवार म्हणाले, ‘‘त्या वेळी तसे झाले असेल, तर कुणीतरी लक्षात आणून द्यायला हवे होते. मला तर आता तुम्ही प्रश्न विचारल्यावर माहिती मिळाली. मी यासंबंधी माहिती घेईन; पण देशद्रोही, समाजकंटक यांचा कुणीही विचार करू नये, त्यांच्या चांगल्या गोष्टी बोलण्याचाही प्रयत्न करू नये.’