पुणे – अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने मंचर येथील महावीर डेअरी अँड स्वीट मार्टने अस्वच्छ स्थितीत खवा अन् गुजरात बर्फी साठवल्यामुळे, तसेच चाकण येथील २ मिठाई विक्रेत्यांनी मिठाई ट्रे वर ‘बेस्ट बिफोर’ (खाण्यास योग्य) दिनांक नमूद केले नसल्याचे आढळल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
महावीर डेअरी अँड स्वीट मार्ट, मंचर या स्वीट मार्टवर धाड टाकून अस्वच्छ स्थितीत साठवलेला खवा आणि स्वीट खव्याचे (गुजरात बर्फी) दोन नमुने घेऊन उर्वरित २३ सहस्र ८०० रुपये किमतीचा ११९ किलो खवा आणि ५ सहस्र ६०० रुपये किमतीचा २८ किलो स्वीट खवा (गुजरात बर्फी) असा एकूण २९ सहस्र ४०० किमतीचा साठा जप्त केला. स्वीट खवा आणि गुजरात बर्फी ही साखर, दूध पावडर, खाद्यतेल आदी घटक पदार्थांपासून बनवण्यात आल्याचे लेबलवरून स्पष्ट होते.
सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेवरती ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद करावा आणि मिठाई बनवण्यासाठी भेसळयुक्त स्वीट खव्याचा (गुजरात बर्फी) वापर करू नये, दुधापासून बनवलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा. स्वीट खव्याचा (गुजरात बर्फी) वापर करून मिठाई बनवत असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी कळवले आहे.