पश्चिम महाराष्ट्रात भावपूर्ण वातावरणात दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे  विसर्जन !

पुणे, १ सप्टेंबर (वार्ता.)- पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या शहरांमध्ये दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे ‘गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपति निघाले गावाला चैन पडेना आम्हाला’ या गजरात भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. सांगलीत महापालिका प्रशासनाने ठिकठिकाणी कृत्रिम कुंड ठेवले होते; मात्र भाविकांनी त्याकडे पाठ फिरवत कृष्णा नदीच्या काठावर आरती करून साश्रू नयनांनी श्री गणेशाला निरोप दिला.

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने पंचगंगा नदीजवळ बॅरिकेटस् लावून भाविकांना नदीत विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली.
झंवर उद्योग समूह आणि श्रीराम प्रा. लि यांनी पंचगंगा नदीच्या काठावर कृत्रिम विसर्जन कुंड उभारले आहे.

सांगलीत कृष्णा नदीत दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना भाविक

सोलापूर शहरात महापालिकेने सिद्धेश्वर आणि संभाजी तलावाजवळ विसर्जन कुंडांची सोय केली होती. याच ठिकाणी श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. पुणे येथील ओंकारश्वर घाट, एस्.एम्. जोशी पुलाजवळील घाट यांसह अन्य घाटांवर भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले. कोल्हापूर शहरात काही भाविकांनी पंचगंगा नदीत विसर्जन केले; मात्र येथेही मोठ्या प्रमाणात कुंड उभारले आहेत. या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रही उभारण्यात आली होती. बहुतांश सर्वच शहरांमध्ये ‘निर्माल्य संकलन केंद्रे’ उभारण्यात आली होती आणि भाविकांना नदीत निर्माल्य विसर्जित करण्यास बंदी करण्यात येत होती. (प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषण होते म्हणून आग्रही भूमिका घेणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी गप्प का रहाते ? – संपादक)