गेली २० वर्षे भारतात अनधिकृतपणे वास्तव्य असल्याचे उघड
मडगाव, २९ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात वार्का येथे गेली ४ वर्षे कुटुंबियांसह अनधिकृतपणे वास्तव्यास असलेला बांगलादेशी नागरिक मेहराज मुताहर याला आंतकवादविरोधी पथकाने कह्यात घेऊन कोलवा पोलिसांना पुढील कारवाईसाठी सुपुर्द केले आहे. मेहराज मुताहर हा वार्का येथे भंगार गोळा करण्याचे काम करतो. याविषयी पोलिसांनी गोव्यातील विदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयाला कळवल्यावर त्यांनी मेहराज मुताहर याला घरातून बाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, ‘‘गोव्यातील आतंकवादविरोधी पथकाला गोपनीय माहिती गोळा करत असतांना वार्का येथे वास्तव्यास असलेल्या बांगालदेशी जोडप्याविषयी माहिती मिळाली. पथकाने या जोडप्यावर पुढे काही दिवस देखरेख ठेवली. यानंतर पथकाने जोडप्याचे अन्वेषण केले असता त्यांनी बांगलादेशी नागरिक असल्याची स्वीकृती दिली. आतंकवादविरोधी पथक गोव्यात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या शोधात असते. मेहराज मुताहर २० वर्षांपूर्वी भारतात आला आणि त्याने उत्तरप्रदेश, तसेच देहली येथे वास्तव्य केले आहे. तो वार्का येथे त्याची पत्नी आणि मुलासह रहातो.’’
गोव्यातील विदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयाचे अधिकारी म्हणाले, ‘‘मेहराज मुताहर याला घरीच रहाण्याच्या बंधनाचा आदेश दर मासाला वाढवण्यात येणार आहे आणि मेहराज मुताहर हा जर बेपत्ता झाला, तर त्याच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यात येणार आहे. (असे करण्यापेक्षा त्याला कह्यात घेऊन कोठडीत का टाकले जात नाही ? गेली २० वर्षे तो भारतात रहात असतांना सुरक्षादलांना त्याचा पत्ता लागला नाही, तर तो बेपत्ता म्हणजे पसार झाल्यावर तो पुन्हा त्वरित सापडणार आहे का ? – संपादक) परराष्ट्र मंत्रालय बांगलादेश उच्चायुक्तांकडून मेहराज मुताहर याचा बांगलादेश येथील पत्ता आणि तेथील पोलीस ठाण्याचा पत्ता मिळवणार आहे. मेहराज मुताहर याच्याकडे पारपत्र आणि ‘व्हिसा’ नसल्याने त्याला आपत्कालीन प्रवास कागदपत्रे दिली जाणार आहेत. यानंतर मुताहर कुटुंबियाला बांगलादेश येथे पाठवण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे सुपुर्द केले जाणार आहे.’’
कोलवाळ येथे गत मासात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या २ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले
विदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयाने कोलवाळ येथे अनधिकृपणे वास्तव्यास असलेला अब्दुल रझाक खान आणि त्याची पत्नी खादीज अख्तर यांना गेल्या मासात कह्यात घेतले होते. या जोडप्याला ६ वर्षांचा मुलगा असून त्याचा जन्म बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झाला होता. विदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयाने या जोडप्याला घरातच रहाण्याचे बंधन घातले आहे. हे जोडपे गेली १२ वर्षे भारतात वास्तव्यास आहे आणि ते भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करत होते.
संपादकीय भुमिकागेली २० अनधिकृतपणे वास्तव्य करत असूनही त्याचा पत्ता न लागणे भारतीय सुरक्षादल किंवा पोलीस यांना लज्जास्पद ! |