लोकशाहीने चाललेल्या भारताचा विनाश करणे, हे डाव्यांचे कारस्थान ! – माधव भांडारी, ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते

पुणे येथे ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते श्री. माधव भांडारीलिखित ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

डावीकडून प्रदीप रावत,  प्रवीण दीक्षित आणि  माधव भांडारी

पुणे, २७ ऑगस्ट (वार्ता.) – संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले तेव्हा त्यावर तारीख होती २६ नोव्हेंबर १९४९. त्या वेळी त्यामध्ये ‘समाजवाद’ आणि ‘सेक्युलॅरिझम’ हे २ शब्द घातले गेले नव्हते. ते शब्द आणीबाणीच्या वेळेस वर्ष १९७५ मध्ये घातले गेले. येथूनच डाव्या विचारसरणीला आरंभ झाला. गेले शतकभर समाजात डाव्या विचारसरणीच्या व्यक्तींनी, संघटनांनी जे काही उद्योग केले आहेत, त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्याला भोगावे लागले. हा इतिहास समजून घ्यावा लागेल. जे इतिहास समजून घेत नाहीत, त्यांना त्यांचा भविष्यकाळ घडवता येत नाही. लोकशाहीने चाललेल्या भारताचा विनाश करणे, हे डाव्यांचे कारस्थान आहे. धार्मिक संघर्ष पसरवण्याचे काम हे डावे करत होते, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते श्री. माधव भांडारी यांनी व्यक्त केले. येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, शिवाजीनगर येथे २७ ऑगस्ट या दिवशी विवेक विचार मंच, महाराष्ट्र, लोकशाही जागर मंच, पुणे आणि राजे शिवराय प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते श्री. माधव भांडारीलिखित ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक श्री. प्रवीण दीक्षित,  तसेच माजी खासदार आणि विवेक विचार मंचचे अध्यक्ष श्री. प्रदीप रावत यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. श्री. प्रदीप रावत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी श्री. माधव भांडारी यांनी या पुस्तकाविषयी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

 नक्षलवादाची कीड नष्ट करण्यासाठी त्याला त्याच प्रकारच्या ताकदीने उत्तर द्यावे लागेल ! – प्रदीप रावत, माजी खासदार आणि विवेक विचार मंचचे अध्यक्ष

या वेळी श्री. प्रदीप रावत म्हणाले की, संपूर्ण नक्षलवादाची कीड नष्ट करण्यासाठी त्याला त्याच प्रकारच्या ताकदीने उत्तर द्यावे लागेल. प्रश्न रेंगाळत ठेवून चालणार नाही. यासाठी कायदे पालटावे लागतील. भारतात हे करण्यासाठी जनतेत जागृती आणि सरकारवर दबाव आणला पाहिजे. भारताचे तुकडे करण्याची मनीषा सर्वांनी हे पुस्तक आग्रहाने वाचावे.