७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस्.टी.च्या सर्व बसगाड्यांमधून प्रवास विनामूल्य !

मुंबई – राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस्.टी.च्या बसमधून विनामूल्य प्रवास योजना चालू करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या योजनेचा अनुमाने १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना लाभ होणार आहे. एस्.टी.च्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही विनामूल्य प्रवासाची योजना लागू असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

विधीमंडळाच्या समितीच्या कक्षात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठीच्या प्रमाणपत्रांचे वितरण एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकनाथ शिंदे यांनी १६ ऑगस्ट या दिवशी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस्.टी. बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. त्याचा शुभारंभ २५ ऑगस्ट पासून करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिकांची ३४ लाख ८८ सहस्र स्मार्ट कार्डची नोंदणी झाली आहे. त्यांपैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १४ लाख ६९ सहस्र आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून विनामूल्य प्रवासासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र, केंद्र आणि राज्य शासनाकडून दिलेले ओळखपत्र यांपैकी कुठलेही एक ओळखपत्र दाखवल्यास शून्य मूल्य वर्गाचे तिकीट देऊन प्रवास करता येणार आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस्.टी.च्या साध्या बससेवांमध्ये ५० टक्के सवलत मिळत होती. ती सवलत वातानुकुलीत, शयनयान आणि शिवनेरी या उच्च श्रेणी सेवांनाही लागू होणार आहे.