टेक्सास (अमेरिका) येथे भारतीय महिलांवर वर्णद्वेषी आक्रमण

महिलेकडून ठार मारण्याचीही धमकी

भारतीय वंशाच्या ४ महिलांवर आक्रमण करणारी एस्मेराल्डा अप्टन

टेक्सास (अमेरिका) – येथे एका अमेरिकी-मेक्सिको वंशाच्या एस्मेराल्डा अप्टन नावाच्या महिलेने भारतीय वंशाच्या ४ महिलांवर आक्रमण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या महिलेने त्यांना बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

भारतीय वंशाच्या महिला हॉटेलमध्ये जेवण करून वाहनतळाच्या दिशेने जात होत्या. तितक्यात अचानक ही महिला तेथे आली आणि तिने भारतीय महिलांना अपशब्द वापरण्यास चालू केले. ती म्हणाली ‘‘मी भारतियांचा तिरस्कार करते. सर्व भारतीय चांगले आयुष्य जगता यावे म्हणून अमेरिकेत येतात. माझा जन्म अमेरिकेत झाला आहे; मात्र मी जिथे जाते तिथे मला केवळ भारतीयच दिसतात. भारतात चांगले जीवन जगता येते; मग तुम्ही तिथेच का नाही रहात ? अमेरिकेत का येता ?’’ तसेच तिने या महिलांना मारहाण आणि शिवीगाळ केली.

संपादकीय भूमिका

भारतातील कथित धार्मिक हिंसाचारावरून भारतावर टीका करणार्‍या अमेरिकेचे खरे स्वरूप हेच आहे, हे लक्षात घ्या !