म्हशींसोबत आंदोलन करण्याची अनुमती मागणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली

चेन्नई – म्हशींसोबत आंदोलन करण्यासाठी अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली. ‘असे केल्याने प्राण्यांच्या संदर्भातील कायद्याचे उल्लंघन होते’, असे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन्. सतीश कुमार यांनी विल्लुपुरम जिल्ह्यातील रहिवासी के. मुर्तू यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सांगितले.

१. के. मुर्तू यांनी ११ ऑगस्ट २०२२ या दिवशी तिरुवेन्नाइल्लूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचा आदेश रहित करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट केली होती.

२. यामध्ये त्यांनी ‘म्हशीला सोबत घेऊन आंदोलन करण्यास अनुमती द्यावी आणि तिला प्रतिकात्मकरित्या याचिका सादर करण्यास अनुमती द्यावी’, अशी मागणी केली होती.

३. जमिनीवरील अतिक्रमण आणि त्यासंबंधीचे वाद यासंदर्भातील त्यांच्या तक्रारीवर पोलीस अधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप करत त्यांनी ही मागणी केली होती. (जनताद्रोही पोलीस ! – संपादक)

४. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती म्हणाले की, लोकशाही पद्धतीने निषेध करण्यासाठी प्राण्यांना क्रूरतेने वागवणे योग्य नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याला म्हैस किंवा इतर कोणताही प्राणी यांना घेऊन जाण्याची आणि त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रदर्शनाच्या ठिकाणी ठेवण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही. असे करणे म्हणजे प्राण्यांसाठीच्या क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणारे आहेे.

५. या वेळी याचिकाकर्त्याने कोणत्याही प्राण्याला सहभागी करून न घेता आंदोलन करण्यासाठी अनुमती देण्याची मागणी केली. यावर न्यायाधिशांनी त्यांना स्थानिक पोलिसांनी निश्‍चित केलेल्या ठिकाणी सर्व नियमांचे पालन करून आंदोलन करण्याची अनुमती देण्याचे निर्देश दिले.