ट्विटरकडून सर्बियाच्या ७ दूतावासांची खाती तडकाफडकी बंद !

‘कोसोवा’ आणि ‘सर्बिया’ या देशांतील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय

बेलग्रेड (सर्बिया) – पूर्व युरोपातील देश सर्बियाच्या ७ देशांतील दूतावास, तसेच अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील सर्बियाचे कार्यालय यांची ट्विटर खाती तडकाफडकी बंदी करण्यात आली आहेत. सर्बियाने ट्विटरच्या या कृत्याचा निषेध करत ‘लोकशाहीचा समर्थक असलेल्या सर्बियाच्या भाषणस्वातंत्र्यावरील हे आक्रमण अस्वीकारार्ह आहे’, असे म्हटले आहे.

१. सर्बियाच्या अर्मेनिया, घाना, इराण, इंडोनेशिया, कुवेत, नायजेरिया आणि झिम्बाब्वे येथील दूतावासांच्या कार्यालयांची ट्विटर खाती एकाएकी बंद करण्यात आली, अशी माहिती सर्बियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

२. विशेष म्हणजे सर्बिया हा युरोपीयन युनियनचा सदस्य देश बनण्यासाठी दशकभरापासून प्रयत्नशील आहे; परंतु त्याला अजूनही या गटात सहभागी करून घेण्यात आलेले नाही. सर्बियापासून वेगळा झालेला कोसोवा या प्रदेशाने काही वर्षांपूर्वी स्वत:ची स्वायत्तता घोषित केली होती. त्याला अमेरिका आणि अन्य ९६ देशांनी समर्थन दिले असले, तरी रशिया, चीन यांच्यासह जगभरातील अनेक देशांनी मात्र विरोध दर्शवला आहे.

३. उभय देशांतील पुन्हा वाढलेल्या संघर्षामुळे ट्विटरकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

४. ‘सर्बियाच्या ट्विटर खात्यांवरील कारवाई अमेरिकेचे ट्विटरवरील वर्चस्व आणि ट्विटरचे कथित अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टींवर प्रकाश टाकते’, असा आरोप केला जात आहे.

५. गेल्याच आठवड्यात सर्बियाच्या १३ खासदारांची ट्विटर खातीही बंद करण्यात आली आहेत.