गया येथील विष्णुपद मंदिरात बिहारमधील मुसलमान मंत्र्याचा प्रवेश !

  • मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमवेत थेट गर्भगृहात गेले

  • अहिंदूंना प्रवेश वर्जित असलेल्या विष्णुपद मंदिराची गंगाजलाने शुद्धी !

राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री महंमद इजराइल यांचा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमवेत थेट मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश !

गया (बिहार) – येथील प्रसिद्ध विष्णुपद मंदिरात अहिंदूंना प्रवेश वर्जित असतांनाही राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री महंमद इजराइल यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमवेत थेट मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. हिंदूंनी यास तीव्र विरोध दर्शवला असून नितीश कुमार यांच्यावर हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवल्याचा आरोप करण्यात येत आहे. इजराइल यांच्या प्रवेशामुळे संपूर्ण मंदिराची गंगाजलाने शुद्धी करण्यात आली.

१. नितीश कुमार हे गया जिल्ह्याच्या दौर्‍यावर असतांना पूजा करण्यासाठी त्यांनी विष्णुपद मंदिराला भेट दिली. मंदिराच्या बाहेर ‘अहिंदूंना मंदिरात प्रवेश नाही’, असा स्पष्ट सूचनाफलक लावलेला असतांनाही राज्याचे मंत्री इसराइल यांनी मंदिरात प्रवेश केला. या वेळी त्यांच्यासमवेत असलेले राज्याचे मुख्य सचिव आमिर सुहानी यांना हा नियम ठाऊक असल्याने ते मंदिराच्या बाहेरच थांबले.

२. यानंतर इजराइल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना ‘माझे सौभाग्य आहे की, ‘मला विष्णुपद मंदिराच्या गर्भगृहात जाण्याची संधी मिळाली’, असे विधान केले. यामुळे हिंदू संतप्त झाले असून त्यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. एका हिंदूने म्हटले की, नितीश कुमार यांनी जामा मशिदीत जाऊन हवन करून दाखवावे.

मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली ! – मंदिर समिती

ही घटना समोर येताच मंदिर समिती आणि पुजारी यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंभु लाल बिठ्ठल यांनी भगवान श्रीविष्णूंची क्षमा मागितली असून गर्भगृह आणि मंदिर गंगाजलाने शुद्ध केले. बिठ्ठल म्हणाले की, मुसलमानाच्या प्रवेशाने मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांसमवेत कोण कोण असणार आहेत?, याविषयी काहीच ठाऊक नव्हते. यामुळे मी केवळ भगवंताचीच नाही, तर समस्त हिंदु समाजाचीही क्षमायाचना करतो. या घटनेमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा प्रयत्न नाही ना ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !
  • असे जर कुठल्या हिंदूने अन्य पंथियांच्या श्रद्धस्थानांशी संबंधित वर्जित स्थळी प्रवेश केला असता, तर एव्हना पुरोगाम्यांची ‘त्या हिंदूचे दंगल भडकावण्याचे षड्यंत्र होते’, असा आरोप करण्यापर्यंत मजल केली असती ! आता मात्र त्यांना सर्वधर्मसमभाव आठवेल !