सुराज्य निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

उज्जैन (मध्यप्रदेश) येथील भारतमाता मंदिरामध्ये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

उज्जैन – आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंदही आहे; पण यासमवेतच भारताचे विभाजन आणि त्या वेळी लक्षावधी हिंदु बांधवांच्या नरसंहाराची वेदनाही आहे. आम्हाला भारताला हिंदु राष्ट्र बनवून अखंड भारताच्या निर्मितीचा संकल्प करावा लागेल. आजचे स्वराज्य अपूर्ण आहे. आता आम्हाला स्वदेशीच्या माध्यमातून सुराज्यापर्यंत अर्थात् हिंदु राष्ट्राकडे जाण्यासाठी आपल्याला संकल्प करावा लागेल. आपली व्यवस्था, राज्यव्यवस्था, कायदे, शिक्षणव्यवस्था, भाषा इत्यादींच्या माध्यमातून आपल्याला परत स्वराज्यातून सुराज्याकडे वळावे लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येथील भारतमाता मंदिराच्या मैदानामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक तथा माधव सेवा न्यासाचे अध्यक्ष श्री. बलराज भट्ट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संघाचे सामाजिक सद्भाव माळवा प्रांत सहसंयोजक तथा माधव सेवा न्यासाचे सचिव श्री. विपीन आर्य, कुटुंब प्रबोधन प्रांत संयोजक श्री. विजय केवलिया, माधव सेवा न्यासाचे कोषाध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संपर्क प्रमुख श्री. नितीन गरुड आदी मान्यवर, संघ परिवाराचे कार्यकर्ते आणि मंदिरातील भाविक उपस्थित होते.

ध्वजारोहण झाल्यानंतर संबोधित करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिन साजरा करतांना आपली वैभवशाली परंपरा युवा पिढीसमोर ठेवणे आवश्यक आहे. महाकाल ही काळाची देवता आहे. समयाचे निर्धारण महाकालनगरी उज्जैन येथून होत होते; परंतु धूर्त इंग्रजांनी याला ‘ग्रीनवीच टाईम झोन’(ब्रिटीश क्षेत्रांमधील मानक वेळ) मध्ये स्थानांतरित केले. तरीही ‘२४ घंट्याचा एक दिवस का ?’, याचे उत्तर इंग्रज देऊ शकले नाही. याचे उत्तर आपल्या पंचागामध्ये आहे. आपला सूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंत एक दिवस असतो. उज्जैनचा राजा विक्रमादित्य सारख्या पराक्रमी राजाची ही भूमी आहे, ज्यांच्या अलौकिक पराक्रमामुळे विक्रम संवत प्रारंभ करण्यात आला आहे. भगवान श्रीकृष्णही उज्जैनच्या सांदिपनी गुरुकुलमध्ये शिकले. आज धर्मरक्षक आणि धर्मसंस्थापक निर्माण करणारी ही गुरुकुल परंपरा संपूर्ण भारतात स्थापन करण्याची वेळ आली आहे.