Karnataka Detergent N Chemicals In IceCream : आईस्क्रीममध्ये डिटर्जंट आणि शीतपेयमध्ये फॉस्फोरिक ॲसिडचा वापर !

अन्न सुरक्षा विभागाकडून ९७ दुकानांना नोटिसा

बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने आईस्क्रीम आणि शीतपेये यांचे उत्पादन करणार्‍या विविध स्थानिक उत्पादन दुकानांवर धाडी घातल्या. अन्न उत्पादनांची गुणवत्ता आणि उत्पादन पद्धतींचे मूल्यांकन करण्यासाठी या धाडी घालण्यात आल्या. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाला आईस्क्रीममध्ये डिटर्जंट पावडरचा वापर केल्याचे, तर शीतपेयमध्ये हाडे कमकुवत करणार्‍या फॉस्फोरिक ॲसिडचा वापर करण्यात आल्याचे आढळले. याविषयी अधिकार्‍यांनी ९७ दुकानांना चेतावणीच्या नोटिसा बजावल्या आहेत. तसेच आईस्क्रीम आणि शीतपेय उत्पादकांना एकूण ३८ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.

१. अधिकार्‍यांना अनेक ठिकाणी अस्वच्छ परिस्थिती आणि देखभालीची कमतरता आढळली.

२. काही उत्पादक उत्पादन खर्च अल्प करण्यासाठी डिटर्जंट, युरिया किंवा स्टार्च यांपासून बनवलेले कृत्रिम दूध वापरत असल्याचे आढळून आले.

३. नैसर्गिक साखरेऐवजी ते पदार्थांची चव आणि रंग वाढवण्यासाठी सॅकरिन आणि  हानिकारक रंग वापरत असल्याचे आढळून आले.

४. अनेक उत्पादक आईसकँडी आणि शीतपेये बनवण्यासाठी दूषित किंवा पिण्यायोग्य नसलेले पाणी वापरत होते.

संपादकीय भूमिका

जनतेच्या जीवाशी खेळणार्‍या अशा लोकांना सरकारने आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !