देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयची धाड

देशात अन्य २१ ठिकाणीही धाडी !

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया

नवी देहली – देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह देशातील २१ ठिकाणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) १९ ऑगस्ट या दिवशी धाडी घातल्या. देहलीतील उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततेच्या आरोपावरून या धाडी घालण्यात आल्या. गेल्या मासात देहलीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी देहली उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. याप्रकरणी त्यांनी उत्पादन शुल्काच्या ११ अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाईही केली होती. विशेष म्हणजे मनीष सिसोदिया यांनीदेखील सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आता मनीष सिसोदिया, तसेच देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून या धाडींचा निषेध केला आहे.

१. सिसोदिया यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही प्रामाणिक आहोत. सत्य लवकर समोर येण्यासाठी आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू. माझ्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे नोंदवण्यात आले; मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. या कारवाईतूनही काहीही समोर येणार नाही. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. जो चांगले काम करतो, त्याला असाच त्रास दिला जातो. आपल्या देशाचे हे दुर्दैव आहे. याच कारणामुळे आपला देश प्रथम क्रमांकावर नाही.

२. मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, देहलीच्या शिक्षण धोरणाचे कौतुक होत असतांना आणि त्याविषयी अमेरिकेतील सर्वांत मोठे वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये मनीष सिसोदिया यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले असतांना त्याच दिवशी केंद्र सरकारने सिसोदिया यांच्या घरी सीबीआयला पाठवले. आम्ही तिला पूर्ण सहकार्य करू. याआधीही धाडी पडल्या असून चौकशाही झाल्या आहेत; मात्र त्यातून काही बाहेर आलेले नाही. या वेळीही काही मिळणार नाही.