महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार देतांना राज्यातील रुग्णालयांकडून गोरगरिबांची परवड !

  • जनतेच्या आरोग्याच्या संदर्भात असा प्रकार होणे अपेक्षित नाही !

  • मागील १० वर्षांत रुग्णालयाच्या विरोधात ३४ सहस्र ५३३ तक्रारी

  • विधानसभेतील सर्वपक्षीय २५ आमदारांनी उपस्थित केला प्रश्‍न

मुंबई – आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब जनतेला गंभीर आजारांवरील उपचार मिळावेत, तसेच शस्त्रक्रिया नि:शुल्क व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ राबवण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत उपचारांसाठी येणार्‍या गरीब रुग्णांना रुग्णालयांकडून नाडले जात असल्याच्या सहस्रावधी तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या आहेत. २ जुलै २०१२ पासून राज्यातील रुग्णालयांच्या विरोधात अशा प्रकारच्या तब्बल ३४ सहस्र ५३३ तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी १८ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत एका तारांकित प्रश्‍नाला दिलेल्या उत्तरामध्ये दिली.

ते पुढे म्हणाले की,

१. आरोग्य विभागाकडे आलेल्या तक्रारींमधील ३१ सहस्र १२७ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून ३ सहस्र ४०६ तक्रारी निवारणाच्या प्रक्रियेत आहेत.

२. ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’च्या अंतर्गत शासकीय, निमशासकीय, खासगी, तसेच धर्मादाय संस्थेची रुग्णालये यांमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब नागरिक यांच्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील ९७३ रुग्णालये कार्यरत आहेत.
या योजनेच्या अंतर्गत रुग्णालयांकडून रुग्णांना नाडण्यात येत असल्याचा तारांकित प्रश्‍न विधानसभेतील विविध पक्षांतील २५ आमदारांनी विधानसभेत उपस्थित केला. खासगी रुग्णालयांकडून औषधे आणणे आणि वैद्यकीय चाचण्या करणे, यांच्या नावाखाली या योजनेच्या लाभार्थींची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप सर्व आमदारांनी केला आहे. हे आरोप काही प्रमाणात खरे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनीही मान्य केले आहे.

गोरगरिबांना लुबाडणार्‍या रुग्णालयांच्या विरोधात कोणतीही ठोस भूमिका नाही !

‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’च्या अंतर्गत खासगी रुग्णालयांकडून गोरगरिबांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर प्रश्‍न एवढ्या आमदारांनी उपस्थित केल्यानंतर ‘आरोग्यमंत्र्यांनी त्यावर काय कारवाई करणार ?’ याविषयीची माहिती सभागृहाला देणे अपेक्षित होते; परंतु त्यांच्या उत्तरात योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणार्‍या सुविधांविषयीची माहिती देण्यात आली आहे.