नवी मुंबई – उज्ज्वल भारतनिर्मितीसाठी मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वाशी येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित ‘विज्ञानाधिष्ठित समाजाकडे’ या विषयावर ते बोलत होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर पुढे म्हणाले की,
१. मुलांना भरपूर शिकू द्या. त्यांच्या शिक्षणातच त्यांचे भविष्य आहे. मुलांमध्ये जिज्ञासा वाढीसाठी त्यांना प्रश्न विचारण्याची सवय लावावी.
२. ‘राईट टू एज्युकेशन’च्या (शिक्षणाचा अधिकार) पुढे जाऊन ‘डिजिटल राईट टू एज्युकेशन’ दिले पाहिजे. पालटत्या युगात नवीन शोधांमुळे भविष्याचा वेध घेऊन शिक्षणपद्धतीत पालट करणे आवश्यक आहे. आपण जे शिकवतो, ते मुलांच्या भविष्याचा विचार करून शिकवायला हवे.
३. महत्त्वाकांक्षा उंच ठेवा. प्रज्ञेला परिश्रमाची जोड द्या. समस्येचा भाग न होता उत्तराचा भाग होण्याचा कसोशीने प्रयत्न करा. आत्मविश्वास आणि चिकाटी ठेवून काम करत रहा. उत्तमतेच्या यशाच्या पायर्यांना शेवट नसतो, हे ५ अनुभवसिद्ध मंत्र (गोष्टी) आहेत.