वास्को येथे १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार

  • ४ जणांना अटक 

  • गोवा हादरला !

वास्को, १७ ऑगस्ट (वार्ता.) – येथील ४ जणांनी एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुकुंद रावल (वय ३५ वर्षे), गुरुव्यंकटेश गुरुस्वामी (वय ३० वर्षे) कुश जैसवाल (वय ३० वर्षे) आणि अख्तर हुसेन (वय २३ वर्षे) या ४ जणांना अटक करण्यात आली आहे.

या ४ जणांनी या मुलीचे ११ ऑगस्ट २०२२ या दिवशी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी ११ ऑगस्टपासून घरातून बेपत्ता असल्याने तिच्या आईने वास्को पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मंगळवार, १६ ऑगस्ट या दिवशी या मुलीचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन या मुलीची सुटका केली. या मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, ११ ऑगस्टपासून ४ जणांपैकी तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. चौथी व्यक्ती या मुलीच्या कुटुंबियांच्या परिचयाची होती. त्याने वर्ष २०२१ मध्ये मार्च आणि ऑगस्ट मासांत तिचे लैंगिक शोषण केले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. वास्को पोलिसांनी या चारही जणांना कह्यात घेतले असून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता, पॉक्सो कायदा आणि ‘गोवा चिल्ड्रन्स ॲक्ट’ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने संपूर्ण गोवा हादरला आहे. उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल आदी अन्य राज्यांत घडणारे गुन्हे आता गोव्यातही घडू लागल्याने सर्वसामान्य गोमंतकीय चिंतातूर झाला आहे. या प्रकरणातही सर्व गुन्हेगार परराज्यांतील असल्याचे समजते.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकरणातील खटले वर्षानुवर्षे न चालवता जलद गतीने चालवून बलात्कार्‍यांना फाशी होणे आवश्यक आहे !