मुंबई, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत व्याख्यानांद्वारे प्रबोधन !

स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !

समितीचे  श्री. प्रसाद वडके यांचा सत्कार करतांना श्री सहकारी विक्रेता संघाचे  श्री. दत्ता घाटकर

मुंबई, १६ ऑगस्ट (वार्ता.) – आपल्याला स्वातंत्र्य हे केवळ सत्याग्रहाने मिळालेले नसून भारतमातेच्या सहस्रो वीरांनी स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन ते मिळवले आहे. स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला या वीरांनी प्राणांचे बलीदान देऊन जपले आहे आणि आजही आपले सैनिक सीमेवर त्यासाठी सिद्ध आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य आणि ध्वज यांचा सन्मान राखणे, हे प्रत्येक भारतियाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी येथे केले. दादर टी.टी. येथील ‘श्री सहकारी विक्रेता संघ’ यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी संघाचे संस्थापक श्री. दत्ता घाटकर यांनी श्री. वडके यांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला.

संयुक्त नगर शिवसेना शाखा नालासोपारा येथे मार्गदर्शन करतांना समितीचे श्री. प्रथमेश कुडव

समितीच्या वतीने मुंबईत दादर, गिरगाव, धारावी, घाटकोपर आणि जोगेश्वरी येथे, नवी मुंबईत ऐरोली आणि नेरूळ येथे, तर पालघर जिल्ह्यात विरार आणि नालासोपारा येथे व्याख्याने झाली. समितीच्या प्रतिनिधींनी या व्याख्यानांतून ध्वजसंहितेचे पालन करत राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचेही आवाहन केले, तसेच राष्ट्राभिमान जागृत करणार्‍या कृती करण्याविषयीही उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले. ५४० हून अधिक नागरिकांनी या व्याख्यानांचा लाभ घेतला .

मार्गदर्शन ऐकतांना नालासोपारा येथील राजा शिवाजी विद्यालयातील विद्यार्थी

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती !

पालघर जिल्ह्यात विरार येथील ‘विवा महाविद्यालय’ आणि नालासोपारा येथील ‘राजा शिवाजी विद्यालय’ येथे समितीच्या सौ. जयश्री अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी १ सहस्र ५०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते. याप्रमाणेच संतोष क्लासेस, चुनाभट्टी आणि गिरगाव येथील कमळाबाई कन्या शाळा येथे समितीच्या सौ. जान्हवी भदिर्के यांनीही शेकडो विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.