सरकारी शाळांना गोव्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक यांची नावे देणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ध्वजारोहण करतांना

पणजी, १५ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा मुक्तीलढ्यात योगदान दिलेले स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक यांची नावे राज्यातील सरकारी शाळांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. १९ डिसेंबर १९६१ या दिवशी गोवा स्वतंत्र झाल्यानंतर ज्या ठिकाणी सर्वप्रथम ध्वज फडकावण्यात आला (जुन्या सचिवालयाजवळ), त्या ऐतिहासिक ध्वजस्तंभावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १५ ऑगस्ट या दिवशी सकाळी अमृत महोत्सवी राष्ट्रध्वज फडकावला. या वेळी त्यांनी जनतेला संबोधित केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पोलीसदलाची मानवंदना स्वीकारतांना

प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर गोवा पोलिसांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सलामी दिली. त्यानंतर गोवा मुक्तीलढ्यातील थोर सेनानींच्या जीवनावरील पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गोवा मुक्तीसाठी योगदान देतांना वीरगती प्राप्त झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मरणोत्तर सन्मान करण्यात आला. सन्मान होणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये ४७ गोमंतकीय आणि २८ परराज्यांतील स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश होता.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर २०२२ मध्ये मोपा विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. गोव्यातील खाण उद्योग पुढील ४ ते ६ मासांत चालू होणार आहे. ‘अमृत सरोवर प्रकल्प’ या योजनेच्या अंतर्गत राज्यातील ७५ तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे आणि यांपैकी २२ तलावांच्या ठिकाणी झेंडावंदन करण्यात येणार आहे. गोव्यातील सर्व शाळांना ‘केअर’अंतर्गत (कोडिंग अँड रोबोटीक्स एज्युकेशन) ‘सिंगल बोर्ड काम्प्युटींग डिवायसीस’ (एकच फलक असलेली संगणकीय उपकरणे) पुरवली जाणार आहेत. गोव्यातील १६ गावे निवडण्यात आली आहेत आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. याद्वारे इतरांना प्रेरणा मिळणार आहे. गोवा सरकारच्या ‘गोवन’ या ‘ब्रँड’च्या अंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये ‘स्फूर्ती क्लस्टर’ स्थापण्यात येणार आहे. नवीन गोवा निर्माण करण्यासाठी प्रत्येक गोमंतकियांनी नवीन गोवा घडवण्यासाठी नवीन कल्पना सुचवाव्यात, तसेच कृतीद्वारे हातभार लावावा.’’

पणजी येथील राज्यस्तरीय महोत्सवासमवेतच राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

गोवा मुक्तीलढ्यात वीरगती प्राप्त झालेल्या परराज्यांतील काही स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांकडे आतापर्यंतच्या शासनांचे दुर्लक्ष ! – कुटुंबियांची खंत

गोवा सरकारने गोवा मुक्तीलढ्यात वीरगती प्राप्त झालेल्या परराज्यांतील काही स्वातंत्र्यसैनिकांचा मरणोत्तर सन्मान केला. स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांना मरणोत्तर सन्मानित करणे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना कार्यक्रमाला आमंत्रित करणे याविषयी सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांमध्ये उत्साह दिसून येत होता; मात्र यामधील काही कुटुंबियांनी मुक्तीलढ्यात वीरगती प्राप्त झाल्यानंतर कुटुंबियांकडे आतापर्यंतच्या सरकारांनी दुर्लक्ष केल्याची खंत प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.