मुंबई – शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (वय ५२ वर्षे) यांच्या गाडीला १४ ऑगस्ट या दिवशी पहाटे ५ वाजता झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्यांच्या गाडीची ट्रकला धडक बसली. अपघातानंतर गंभीर घायाळ झालेल्या मेटे यांना उपचारांसाठी कामोठे येथील ‘एम्.जी.एम्.’ रुग्णालयात नेले असता आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी गाडीचे चालक एकनाथ कदम यांना कह्यात घेतले असून त्यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली आहे. पोलीस अपघाताचा तपशील पडताळून पहात आहेत.
मोठी बातमी! विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला#VinayakMetehttps://t.co/ESXvlfylvs
— ABP माझा (@abpmajhatv) August 14, 2022
अपघाताच्या वेळी गाडीमध्ये विनायक मेटे यांच्यासह त्यांचे एक सहकारी आणि अंगरक्षक होते. मराठा आरक्षणाविषयी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असलेल्या बैठकीसाठी ते बीड येथून मुंबईत येत होते. विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी मेटे यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे.
अपघाताच्या वेळी विनायक मेटे यांच्यासमवेत गाडीत असलेले त्यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी या अपघाताविषयी एका वृत्तवाहिनीला माहिती देतांना सांगितले, ‘‘आमच्या गाडीला मोठ्या ट्रकने ‘कट’ मारला. ट्रकच्या बंपरमध्ये चारचाकी अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. पहाटे ५ वाजता अपघात झाला; परंतु साहाय्य मिळण्यास १ घंटा लागला. मी नियंत्रण कक्षात दूरभाषद्वारे संपर्क साधला; मात्र कर्मचार्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली.’’
‘एम्.जी.एम्.’ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी त्यांना रुग्णालयात आणले गेले. त्यांचा चालक आणि अंगरक्षक यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
विनायक मेटे यांच्या निधनाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘विनायक मेटे यांच्या निधनाने मराठा आरक्षणासह सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, तसेच धडाडीचे नेतृत्व हरपले.’’ यासह ते म्हणाले की, अपघाताची घटना दुर्दैवी आहे. विनायक मेटे यांच्या सहकार्याने घटनास्थळी साहाय्य वेळेवर पोचले नसल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमागील सत्यता पडताळली, तसेच या घटनेची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
विनायक मेटे यांचा परिचय
विनायक मेटे हे अरबी समुद्रात बांधण्यात येणार्या शिवस्मारक समितीचे अध्यक्ष होते. मागील ५ वर्षे ते विधानपरिषदेचे आमदार होते. सध्या त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. २ मासांपूर्वी त्यांचा विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ संपला होता. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे शासन असतांना त्यांनी आघाडीला पाठिंबा दिला होता. भाजपचे शासन आल्यावर त्यांनी युतीला पाठिंबा दिला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावरही त्यांनी भाजपलाच पठिंबा दिला.