‘हर घर तिरंगा’ अभियानाला देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद !

नवी देहली – भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रशासनाकडून १३ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ या अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानानुसार देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याला देशभरातील कोट्यवधी नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. देशातील शहरे आणि गाव यांमध्ये सर्वत्र घराघरांवर तिरंगा ध्वज फडकतांना दिसत आहे. अनेक ठिकाणी मिरवणुका काढण्यात येत आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह अशाच एका मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी मेरठ येथे तिरंगा ध्वज फडकावला. विविध राज्यांमध्ये तेथील मंत्री, सरकारी अधिकारी, सामान्य नागरिक या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी होत आहेत.

चंडीगड विद्यापिठाने नोंदवला जागतिक विक्रम !

चंडीगड विद्यापिठाने फडकणार्‍या राष्ट्रध्वजाच्या आकारातील जगातील सर्वांत मोठी, म्हणजे ५ सहस्र ८८५ जणांची मानवी साखळी सिद्ध करून जागतिक विक्रम नोंदवला. या वेळी चंडीगडचे प्रशासक आणि पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, चंडीगड विद्यापिठाचे कुलगुरु सतनाम सिंह संधू आदी मान्यवर उपस्थित होते.