सीबीआयच्या उपअधीक्षकांना ट्रकखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न

‘सीबीआय’चे उपअधीक्षक रूपेश कुमार श्रीवास्तव

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यातून गोरखपूर येथे जात असातांना केंद्रीय अन्वेषण विभागाचे (‘सीबीआय’चे) उपअधीक्षक रूपेश कुमार श्रीवास्तव यांना ट्रकखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र श्रीवास्तव यांच्या वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने उपअधीक्षक आणि त्याचे स्वतःचे प्राण वाचले. ट्रकने उपअधीक्षकांच्या स्कॉर्पिओ गाडीला दोनदा धडक देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ट्रक पलटी झाल्याने ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. याविषयीची माहिती मिळताच गोरखपूरचे पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक रूपेश कुमार श्रीवास्तव मागील केंद्र आणि राज्य सरकारांशी संबंधित काही संवेदनशील प्रकरणांचे अन्वेषण करत आहेत. या प्रकरणी काही उच्चभ्रू लोकांचा समावेश आहे.

श्रीवास्तव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचा चारा घोटाळा आणि रेल्वे भरती घोटाळा, काँग्रसेचे नेते पी. चिदंबरम् आणि इतर काही मंत्री यांच्या घोटाळ्यांच्या प्रकरणांचे अन्वेषण करत आहेत. श्रीवास्तव यांनीच पी. चिदंबरम् यांना अटक केली होती. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणामागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू करण्यात आले आहे, अशी माहिती गुलरीहाचे पोलीस निरीक्षक उमेश कुमार बाजपेयी यांनी दिली.

संपादकीय भूमिका

गुन्हेगारांना कायद्याचे जराही भय उरले नसल्याचे द्योतक !