‘सोनाराने कान टोचलेले बरे’, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्याचाच प्रत्यय देहली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम्. सिंह यांनी ‘मनुस्मृति’ या हिंदूंच्या पवित्र ग्रंथाविषयी केलेल्या विधानावरून आला. पुरोगामी आणि साम्यवादी यांनी ‘गोबेल्स’ नीतीद्वारे मनुस्मृतीविषयी करता येईल तेवढा अपप्रचार केला. ‘वस्तूतः त्यांचा विरोध केवळ मनुस्मृतीला नव्हे, तर त्या आडून हिंदु धर्माला आहे’, हे आपण सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. या दृष्टीकोनातून मनुस्मृतीला होणार्या विरोधाकडे पाहिल्यास सर्व पटकथा उलगडत जाते. देहलीतील एका कार्यक्रमात देहली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम्. सिंह म्हणाल्या, ‘‘भारतीय स्त्रिया भाग्यवान आहेत; कारण मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांनी स्त्रियांना मानाचे स्थान दिले आहे. मनुस्मृतीत म्हटले आहे की, जर कुणी महिलांचा आदर आणि सन्मान करत नसेल, तर संबंधित व्यक्ती करत असलेल्या पूजा-अर्चा अन् प्रार्थना यांना काहीच अर्थ उरत नाही.’’ त्यांच्या या विधानावरून पुरोगामी आणि साम्यवादी यांनी आकाश-पाताळ एक केले आहे. त्यांनी ‘ट्विटर’वर ‘मनुस्मृति’ कशी स्त्रीविरोधी आहे ?’, हे सांगण्याचा आटापिटा चालवला आहे. असे स्त्रीहक्कवादी कधी अन्य पंथियांतील बुरखा किंवा हलाला पद्धत, चर्चमधील ननवरील बलात्काराची प्रकरणे आदींविषयी अवाक्षरही काढत नाहीत, हे विशेष ! याविषयी त्यांना वैध मार्गाने जाब विचारायला हवा. पुरो(अधो)गाम्यांच्या जसे कुठल्याच आरोपात तथ्य नसते, तसेच ते मनुस्मृतीवरील आरोपांतही नाही. मनुस्मृति जर खरोखरच स्त्रीविरोधी असती, तर आज हिंदु धर्मात अनेक मोठे पराक्रम गाजवणार्या वेदपारंगत गार्गी, मैत्रेयी यांपासून वीरांगना जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर आदी अनेक कर्तृत्ववान स्त्रिया झाल्याच नसत्या. त्यांनी केवळ पराक्रमच गाजवला असे नाही, तर राजधर्मही शिकवला. आजही अनेक हिंदु स्त्रिया उच्चपदांवर आसनस्थ आहेत. न्यायमूर्ती प्रतिभा एम्. सिंह या त्यांपैकीच एक आहेत आणि त्यांनीच मनुस्मृतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यावरून ‘मनुस्मृति’ ही स्त्रीविरोधी असल्याचा पुरोगामी आणि साम्यवादी यांचा खोटारडेपणा उघड होतो. अशा सामर्थ्यवान स्त्रियांची उदाहरणे ते कधीही देत नाहीत; कारण ती त्यांच्यासाठी अडचणीची असतात. इतकेच नव्हे, तर मनुस्मृतीत ‘मातेचा अपमान करू नका’, ‘कुठलेही धर्मकार्य स्त्रियांविना पूर्ण होऊ शकत नाही’, अशा स्त्रियांना अतुलनीय स्थान देणार्या कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत. मग अशी ‘मनुस्मृति’ स्त्रीविरोधी कशी असेल ? पण मनुस्मृतीत सांगितलेल्या अशा गोष्टीही जाणूनबुजून सांगितल्या जात नाहीत किंवा उलट अर्थ काढून सांगितल्या जातात. यावरून ‘मनुस्मृतीच्या आडून हिंदु धर्माला लक्ष्य केले जाते’, असे जे वर म्हटले आहे, ते योग्य असल्याचे स्पष्ट होते.
‘मनुस्मृति’ वाचली तरी आहे का ?
पुरोगामी आणि साम्यवादी हे मनुस्मृतीला विरोध करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा सोयीप्रमाणे वापर करतात. न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी केलेल्या वरील विधानाला विरोध करतांनाही असा वापर केला गेला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदु कोड बिल’ सिद्ध केल्यामुळे हिंदु महिलांना अधिकार मिळाला’, हा त्यातील एक युक्तीवाद आहे. तथापि ते हे सोयीस्करपणे विसरतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पूर्वायुष्यात मनुस्मृतीचे दहन केले होते, हे खरे आहे; पण पुढे त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आणि तिचाच आधार घेऊन ‘हिंदु कोड बिल’ बनवले ! २५ डिसेंबर १९५२ या दिवशी राजाराम चित्रपटगृहात बोलतांना डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘‘माझ्या ‘बिला’च्या टीकाकारांनी ‘बिल हिंदु धर्मशास्त्रास सोडून आहे’, अशी टीका केली; पण तसे म्हणणार्यांना माझे आव्हान आहे की, मनुस्मृतीचा आधार नाही, असे त्यात कोणते कलम आहे, ते त्यांनी दाखवून द्यावे.’’ यासह ११ जानेवारी १९५० या दिवशी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, मी जातीनिर्णयासाठी मनूचा, घटस्फोटासाठी पराशर-स्मृतीचा, तर स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्मृतीचा आधार घेतला आहे. दायभाग पद्धतीच्या वारसा-हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.’ (संदर्भ : ‘बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे, खंड ८, पृष्ठ क्र.१७-१८’ आणि साप्ताहिक ‘जनता’, १४-१-१९५०) ‘मनस्मृति’ हा स्त्रीविरोधी, शूद्रांना हीन लेखणारा आणि समाजात दुही माजवणारा ग्रंथ आहे’, असा विखारी प्रसार करणार्यांना ही सणसणीत चपराकच होय ! मनुस्मृतीचे दहन केल्यानंतरही कालांतराने त्याचाच आधार घेण्याचे औदार्य डॉ. बाबासाहेब यांच्याकडे होते. ते मनुस्मृतीच्या आजच्या ‘आधुनिक’ विरोधकांकडे दिसून येत नाही. भारतात आजही २५ डिसेंबर या दिवशी ‘मनुस्मृति दहन दिवस’ या नावाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा दिवस साजरा करण्याचे आवाहन हिंदुद्रोह्यांकडून केले जाते. ‘मनुस्मृति हा ग्रंथ २ सहस्र ३०० वर्षांपूर्वी लिहिला गेला आहे. हा ग्रंथ जाळणार्यांनी त्याचा अभ्यास तर सोडाच, तो वाचलेला तरी आहे का ?’, हा संशोधनाचा विषय आहे.
मनुस्मृतीचे महत्त्व सांगणार्या न्यायक्षेत्रातील न्यायमूर्ती प्रतिभा एम्. सिंह या एकमेव आहेत, असे नाही. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ‘मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य आहे’, असे मत व्यक्त केले होते. तेव्हाही विरोधक तोंडावर आपटले होते. एकूणच मनुस्मृतीला कितीही विरोध झाला, तरी तिचे महत्त्व यत्किंचितही अल्प होणार नाही. ते कधी न्यायाधीश अब्दुल नझीर यांच्यासारख्यांच्या, तर कधी न्यायमूर्ती प्रतिभा एम्. सिंह यांच्यासारख्यांच्या माध्यमांतून वेळोवेळी अधोरेखित होतच राहील आणि विरोधकांचे पितळ उघडे पडतच राहील, हेच त्रिवार सत्य आहे !
हिंदुद्रोह्यांचा विरोध केवळ मनुस्मृतीला नाही, तर त्याआडून हिंदु धर्माला आहे, हे लक्षात घ्या ! |