‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात पोलीस, प्रशासन आणि शिक्षण विभाग येथे निवेदने !

बारामती (जिल्हा पुणे) येथील पोलीस निरीक्षक महेश ढवाण पाटील यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

सोलापूर – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पोलीस, प्रशासन आणि शिक्षण विभाग यांना निवेदन देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे नायब तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी यांच्या वतीने विस्तार अधिकारी, तर पोलीस निरीक्षक यांच्या वतीने ठाणे अंमलदार यांनी निवेदन स्वीकारले. पंढरपूर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई (बीड) येथे उपविभागीय अधिकारी, गेवराई (बीड) येथे नायब तहसीलदार जाधवर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. याचसमवेत बाराहाळी (नांदेड) येथील ‘विद्या विकास विद्यालय’ आणि ‘स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल’ येथे निवेदन देण्यात आले. या विविध ठिकाणी निवेदन देण्यासाठी विश्व हिंदु परिषद, पेशवा युवा मंच, हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांसह अनेक राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी समिती करत असलेले जागृतीचे कार्य कौतुकास्पद ! – महेश ढवाण पाटील, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे, पुणे

जो कुणी राष्ट्रध्वजाचा अवमान करतांना आढळेल, त्यांच्यावर गुन्हे नोंदवू. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी तुम्ही (हिंदु जनजागृती समिती) पैसे न घेता निरपेक्षपणे राष्ट्रसेवा करत आहात, हे कौतुकास्पद आहे.