मुंगेर (बिहार) येथे एका तरुणाकडून व्हिडिओ बनवून दलित विद्यार्थ्यांना श्री सरस्वतीदेवीच्या विरोधात प्रश्‍न विचारून अवमान करण्याचा प्रयत्न !

एका विद्यार्थ्याकडून विरोध

वेद प्रकाश

मुंगेर (बिहार) – व्हिडिओ बनवून ‘यू ट्यूब’वर अपलोड करणार्‍या वेद प्रकाश नावाच्या तरुणाने येथे ‘आंबेडकर हॉस्टेल’ या दलित विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला भेट दिली. तेथे त्याने विद्यार्थ्यांना विद्येची देवता श्री सरस्वतीदेवी हिच्याविषयी अनेक प्रश्‍न विचारून देवीचा अवमान केला. या वेळी रितेश नावाच्या विद्यार्थ्याने वेद प्रकाश याला विरोध केला.

१. वेद प्रकाश येथील विद्यार्थ्यांच्या एका खोलीत घुसला आणि त्याने खोलीत पडताळणी चालू केली. तेव्हा त्याला सरस्वतीदेवीची २ चित्रे लावलेली दिसली. तेव्हा त्याने विचारले, ‘येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार आणि फुले यांचे एकही छायाचित्र का नाही ?’ यावर रितेश याने सांगितले, ‘बाबासाहेबांचे छायाचित्र बाहेर लावले आहे. श्री सरस्वतीदेवी विद्येची देवता असल्याने खोलीत चित्र लावले आहे.’

२. यावर वेद प्रकाश त्याला विचारतो, ‘ही विद्येची देवता आहे, असे कुणी सांगितले ? कुठून याची माहिती मिळाली ?’ त्यावर रितेश याने म्हटले, ‘ती विद्येची देवता आहे, हे मी मानतो आणि तेच त्याचे विश्‍लेषण आहे.’

३. यानंतर वेद प्रकाश पुनःपुन्हा याविषयी प्रश्‍न विचारतो, तेव्हा रितेश त्याला म्हणतो, ‘असे प्रश्‍न विचारून वाद निर्माण करू नका.’ त्यानंतर तो अन्य विद्यार्थ्यांना हाच प्रश्‍न विचारतो. तेव्हा अन्य विद्यार्थीही ‘आम्ही श्री सरस्वतीदेवीला मानता’, असे सांगतांना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

४. यानंतर तो अन्य मुलांच्या खोलीत जातो. तेथे तो भारतमातेचे चित्र पहातो आणि विचारतो, ‘हिच्या हातामध्ये तिरंगा का नाही ? भगवा झेंडा का आहे ?’

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे आणि हिंदु समाजातील काही घटकांमध्ये धर्माविषयी द्वेष निर्माण करण्यात आल्याने असे प्रश्‍न नेहमीच विचारले जातात ! हे लक्षात घेऊन हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केला पाहिजे !