छत्तीसगडमधील घुमका गावाने केली दारुबंदीची घोषणा !

  • दारुविक्री रोखण्यासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार !

  • दारुविक्री केल्यास ५१ सहस्र रुपयांचा दंड भरावा लागणार

प्रतीकात्मक छायाचित्र

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड राज्यातील बालोद जिल्ह्यातील घुमका गावामध्ये गावकर्‍यांनी दारुबंदी घोषित केली आहे. गावात कुणी दारूची विक्री केली, तर त्याला ५१ सहस्र रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचा नियम बनवला आहे. दारुविक्रीकडे लक्ष ठेवण्यासाठी ३ सहस्र लोकसंख्या असणार्‍या या गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. दारू प्यायलामुळे होणारे गुन्हे रोखण्यासाठी गावकर्‍यांनी हा निर्णय घेतला आहे. सरपंच मिलाप सिंह ठाकूर यांनी सांगितले की, घुमका गावातील प्रत्येक घरातील एक जण व्यसनी होता. त्यामुळे महिला आणि मुले यांना त्रास सहन करावा लागत होता. महिलांनी या संदर्भात केलेल्या विनंतीवरून गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संपादकीय भूमिका

प्रत्येक सरकार महसूल मिळवण्यासाठी मद्यविक्रीला अनुमती देते आणि समाजाचे अधःपतन करते. ‘काही राज्यांत दारुबंदी असली, तरी ती केवळ कागदावर असते’, असे आतापर्यंत दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर घुमका गावाने केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. देशातील प्रत्येक गावाने असा प्रयत्न केला, तर भारताचे होणारे अधःपतन काही प्रमाणात तरी थांबेल !