गोव्यातील १२ तालुक्यांत स्वयंपूर्ण श्री गणेशचतुर्थी बाजार भरणार

पणजी, ४ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा शासन यंदाच्या गणेशचतुर्थीला २० ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत राज्यातील १२ तालुक्यांत स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार भरवणार आहे. या बाजारांत स्थानिक लोकांना श्री गणेशचतुर्थीच्या साहित्याची विक्री करण्यासाठी विनामूल्य कक्ष (स्टॉल) देण्यात येणार आहे. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण चतुर्थी बाजाराचा कृतीआराखडा सिद्ध करण्यासाठी संबंधितांसमवेत ४ ऑगस्टला पूर्वसिद्धता बैठक घेतली.

याविषयी अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘शासन सर्व तालुक्यांत तात्पुरते माटव (मंडप) उभे करणार असून यामध्ये पारंपरिक हस्तकलेच्या वस्तू, माटोळीचे (माटोळी म्हणजे गोव्यात गणपतीच्या मूर्तीसमोर वरच्या भागात सुपार्‍या, फळे आदी टांगलेले असते.) साहित्य, पारंपरिक फुले, पारंपरिक मिठाई आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यांना बाजार मंडपात जागा हवी असेल, त्यांनी संबंधित पंचायतीशी संपर्क साधावा.

(सौजन्य : Goanvarta Live) 

श्री गणेशचतुर्थीमध्ये नैसर्गिक वस्तूंपासून सजावट केलेली असते. हल्ली शासनाच्या वतीने माटोळी बांधण्याच्या स्पर्धा भरवल्या जातात. माटोळीतली बहुतेक फळे, भाज्या आणि वनस्पती औषधी गुणधर्माच्या असतात. चतुर्थी बाजारामध्ये गोव्यातील पारंपरिक गोष्टींचे प्रदर्शन भरवले जाते. ज्यामुळे गोव्यातील कलेला प्रोत्साहन मिळते.’’