सामाजिक माध्यमांच्या आधारे वनस्पतींची लागवड करतांना घ्यावयाची काळजी !

व्हाट्सअपवरील ‘माहिती’ कितपत व्यवहार्य ?

१. कोणत्याही तात्त्विक पुराव्याविना जांभळाच्या लाकडाविषयी ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून अपुरी माहिती देऊन वाचकांची दिशाभूल करण्यात येणे

‘गेल्या काही दिवसांपूर्वी ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून एक संदेश प्रसारित करण्यात आला होता. या संदेशामध्ये ‘जांभळाचे लाकूड आयुर्वेदात कसे उपयोगी आहे ?’, याची माहिती दिली होती.

तसेच या संपूर्ण संदेशात जांभळाच्या लाकडाच्या उपयोगाची काही उदाहरणेही दिली होती. त्यात ‘७०० वर्षांपासून एका विहिरीत जांभळाचे लाकूड वापरल्याने विहिरीचे पाणी गोड झाले. याच समवेत ती विहीर ७०० वर्षे स्वच्छ न करताही चांगली राहिली’, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ७०० वर्षे विहीर स्वच्छ केली नसल्याचा कोणताही पुरावा त्या लेखामध्ये दिलेला नाही. साधारण १०० वर्षांपूर्वी पाहिले, तर संपूर्ण भारत पिण्याच्या किंवा प्रतिदिन वापराच्या पाण्यासाठी विहीर, नदी आणि नाले यांवर अवलंबून होता. त्यामुळे त्या काळी विहिरींची स्वच्छता करण्यासाठी विशेष सोय होती. त्या काळी भारतात एखादी विहीर ७०० वर्षे स्वच्छ केली नाही, हे आश्चर्यकारक वाटते. आणखी सांगायचे झाल्यास सध्याही भारतात लाखो विहिरी आहेत; पण त्या विहिरींमध्ये बांधकामासाठी जांभळाच्या लाकडाचा वापर केला गेल्याची नोंद कुठेही उपलब्ध नाही. आयुर्वेदात जांभळाचे विविध उपयोग असले, तरी त्या संदेशात दिलेली माहिती अपुरी आणि कोणत्याही तात्त्विक पुराव्याविना दिल्याचे दिसून येते.

श्री. अमोल कुळवमोडे

२. पूर्वीपासून कापराची लागवड भारतात होत नसून पूर्व आशिया खंडातील देशांमध्ये त्याची वनस्पती नैसर्गिकरित्या वाढत असणे

काही मासांपूर्वी सामाजिक माध्यमांवर ‘कापूर’ (Cinnamomum camphora) ही वनस्पती किती उपयोगी आहे’, याचा एक संदेश बघायला मिळाला. त्यामध्ये ‘कापराचे झाड किती मोठ्या प्रमाणात हवा शुद्ध करते ? आणि त्याची लागवड करून अल्प कालावधीत कसा पैसा मिळवता येईल ?’, याविषयीची संपूर्ण माहिती दिली होती. या संदेशाच्या शेवटी कापराची रोपे मिळण्यासाठी पुण्यातील एका संस्थेचा पत्ता आणि रोपांचे मूल्यही देण्यात आले होते. त्या संदेशात ‘आपल्या पूर्वजांना कापराच्या वृक्षाचे महत्त्व समजल्यामुळे त्यांनी संपूर्ण भारतात कापूर लावला’, असेही लिहिले होते. मूलतः कापूर हा पूर्व आशिया खंडातील देशांमध्ये नैसर्गिकरित्या वाढतो. पूर्वीच्या भारताचा विचार केल्यावरही कापूर हा त्याच भागात वाढायचा आणि तो सध्याच्या भारतातील कुठल्या जंगलात वाढत असल्याच्या नोंदी उपलब्ध नाहीत. सध्या कापराचा वृक्ष हा भारतातील काही ‘बोटॅनिकल गार्डन’ (वनस्पती उद्यान) किंवा अन्य बागेमध्ये लावला आहे; परंतु तो नैसर्गिक अधिवासात (विशिष्ट ठिकाण) भारतातील कोणत्याही जंगलात मिळत नाही.

सुमात्रा बेटावर आढळणारे कापराचे झाड वर्तुळात दाखवले आहे

१९ व्या शतकाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियामध्ये कापूर वृक्षांची लागवड शोभेचा वृक्ष म्हणून केली होती. पुढील काही वर्षांतच ज्या भागात कापूर लावला होता, त्या आणि अन्य ठिकाणी कापराचे वृक्ष प्रचंड प्रमाणात वाढू लागल्याचे आढळून आले. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये कापराला ‘हानीकारक पद्धतीने पसरवण्याची प्रवृत्ती असलेली जात’ (इन्वेसिव्ह स्पेसिज) म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये कापूर वृक्षाचे ‘क्विनलँड’ आणि ‘न्यू साऊथ वेल्स’ या भागात आक्रमण (इन्व्हेजन) झालेले पहायला मिळते.

३. पूर्वी व्याप्त नसलेल्या क्षेत्रात वनस्पती वाढणे (इन्व्हेजन) म्हणजे काय ?

‘इन्वेसिव्ह’ वनस्पतीविषयी थोडक्यात सांगायचे झाल्यास, जेव्हा एखादी वनस्पती काही कारणास्तव तिच्या मूळच्या अधिवासाच्या बाहेर नवीन अधिवासात वाढू लागते, तेव्हा ती वनस्पती नवीन अधिवासातील स्थानिक वनस्पतींशी वाढण्यासाठी स्पर्धा करते. या नवीन अधिवासात स्थानिक वनस्पतींहून ही वनस्पती जोमाने आणि लवकर वाढते. पुढील काही वर्षांच्या कालावधीतच स्वतःचे वर्चस्व निर्माण करून ती वनस्पती स्थानिक वनस्पतींना धोका निर्माण करते. यालाच शास्त्रीय भाषेत ‘पूर्वी व्याप्त नसलेल्या क्षेत्रात वनस्पती वाढली (इन्व्हेजन)’, असे म्हटले जाते. (यामध्ये कीटक, प्राणी, पक्षी आणि मासे यांचाही समावेश होतो.)

याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेरू ! (Psidium guajava) याचे ‘गॅलापोगोज’ बेटे, हवाई बेटे, न्यूझीलंड आणि अन्य देशांमध्ये ‘इन्व्हेजन’ झाले आहे. पेरूमुळे बर्‍याच देशातील स्थानिक वनस्पतींना धोका निर्माण झाल्याने पेरूचा समावेश ‘जागतिक आक्रमक प्रजातीची माहिती सूची’ (Global Invasive Species Databases) मध्ये करण्यात आला आहे. (www.iucngisd.org/gisd/) अशा प्रकारच्या सहस्रो वनस्पती, प्राणी, पक्षी, मासे आणि कीटक यांचे आक्रमण संपूर्ण जगभर, अगदी भारतातही पहायला मिळते.

४. लोकप्रियतेसाठी काही वनस्पतींना धार्मिक श्रद्धेच्या आधारे संबोधण्यात येणे

बर्‍याच वेळा काही लोकांनी जाणूनबुजून एखादी नवीन वनस्पती वितरित करतांना किंवा तिची माहिती देतांना त्या वनस्पतींना धार्मिक श्रद्धा असणार्‍या गोष्टींचा वापर करून त्यांच्या नावाने संबोधले आहे. जेणेकरून लोक त्याचा आयुर्वेदात किंवा अन्य व्यावहारिक जीवनात वापर करू लागतील. याचे भारतातील उदाहरण, म्हणजे लक्ष्मणफळ (Annona muricata). ही वनस्पती ‘कॅरिबियन’ आणि ‘ट्रॉपिकल अमेरिका’ येथे वाढणारी असून तिची गेल्या काही दशकांमध्ये भारतात लागवड झाली आहे. या वनस्पतीचा औषधात उपयोग असला, तरी ती मूळची भारतीय वनस्पती नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

५. सामाजिक माध्यम किंवा अन्य माध्यमांतून मिळालेल्या माहितीवर विसंबून लागवड करतांना त्याचा संपूर्ण अभ्यास करणे आवश्यक !

‘गोरखचिंच’ (Adansonia digitata) वृक्ष हा मादागास्कर आणि आफ्रिकेतील काही भागांतून आला आहे. अशा प्रकारच्या आयुर्वेदात वापरल्या जाणार्‍या अनेक वनस्पती भारतीय नाहीत. येथे सांगावेसे वाटते की, विदेशातून आलेल्या बर्‍याच वनस्पती औषधी असल्या, तरी त्यांना स्थानिक पर्यायी वनस्पती संपूर्ण भारतभर उपलब्ध आहेत आणि त्यांचा आयुर्वेदात वापर करणे योग्य ठरेल. सामाजिक माध्यमांतून किंवा अन्य माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार लागवड करत असतांना प्रथम त्यांचा संपूर्ण अभ्यास करावा. अन्यथा त्यांची लागवड केलेल्या भूमी नापिक बनण्याची शक्यता आहे, तसेच त्या वनस्पतींपासून लाभ होण्याऐवजी अधिक प्रमाणात हानीच होण्याची शक्यता आहे.’
(टीप : वनस्पतींची नावे स्थानिक भाषेनुसार पालटतात. त्यामुळे लेखात वनस्पतींच्या शास्त्रीय नावांचा उल्लेख केला आहे.)

– श्री. अमोल कुळवमोडे, उंचगाव, कोल्हापूर. (३१.७.२०२२)