गळीत धान्य (तेलबिया) पिकांची (सोयाबीन, तीळ, कारळा, एरंडी इत्यादी पिकांची) लागवड कशी करावी ?

गळीत धान्य पिकांपैकी भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांच्या लागवडी विषयीचे लेख अनुक्रमे ३ जून आणि १७ जून या दिवशीच्या अंकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आजच्या लेखात गळीत धान्य (तेलबिया) पिकांची (सोयाबीन, तीळ, कारळा, एरंडी इत्यादी पिकांची) लागवड कशी करावी ? याविषयीची सविस्तर माहिती येथे देत आहोत.

डॉ. निवृत्ती चव्हाण

१. सोयाबीन

सोयाबीन

१ अ. हवामान आणि भूमी : सोयाबीन हे पीक अल्प ते मध्यम पावसाच्या भूप्रदेशामध्ये घेतले जाते. या पिकास उष्ण आणि कोरडी हवा चांगली मानवते. या पिकासाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी भूमी निवडावी. भूमीचा आम्ल-विम्ल निर्देशांक (पी.एच्.) ६.५ ते ८.० यांमध्ये असावा.

१ आ. पूर्व मशागत : भूमीची १५ सें.मी. खोल नांगरट करावी. प्रती हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत भूमीमध्ये चांगले मिसळावे आणि कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन भूमी भुसभुशीत करावी.

१ इ. पेरणीची वेळ आणि बियाणे : मान्सूनचा पाऊस चालू झाल्यावर आणि भूमीत पुरेसा ओलावा होऊन चांगला वापसा आल्यावर जूनच्या पहिल्या पंधवड्यात पेरणी करावी. पाण्याची सोय असल्यास मेच्या दुसर्‍या पंधरवड्यामध्ये पेरणी केली तरी चालते. पाभरीच्या साहाय्याने पेरणी करावयाची झाल्यास प्रती हेक्टरी ७५ ते ८० किलो आणि टोकण पद्धतीसाठी ४५ ते ५० किलो प्रती हेक्टरी बियाणे वापरावे.

१ ई. पेरणीची पद्धत : भारी भूमीमध्ये ४५ x १५ सें.मी. आणि मध्यम भूमीमध्ये ३० x १५ सें.मी. अंतरावर पाभरीच्या साहाय्याने किंवा टोकण पद्धतीने करावी.

१ उ. बीज प्रक्रिया : सोयाबीन पिकास ‘मुळकुजव्या’ रोग होऊ नये; म्हणून प्रती किलो बियाण्यास २५ ग्रॅम या प्रमाणात ‘ट्रायकोडर्मा हर्जिॲनम’ या जैवनियंत्रकाची बीज प्रक्रिया करावी. सोयाबीन हे द्विदलवर्गीय पीक असल्याने जीवाणूंच्या साहाय्याने मुळावरील गाठीमध्ये वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण होते. त्यासाठी बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर पेरणीपूर्वी १ घंटा अगोदर ‘रायझोबियम जापोनिकम’ हे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात चोळावे. त्यानंतर बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.

१ ऊ. आंतर पिके : सोयाबीन + तूर (३:२) या प्रमाणात घ्यावे.

१ ए. खते : प्रती हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत भूमीत चांगले मिसळावे. या पिकास प्रती हेक्टरी ५० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद पेरणीच्या अगोदर भूमीत मिसळावे.

१ ऐ. आंतर मशागत : तणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीच्या अगोदर ‘पेंडीमेथॅलिन’ (१.५ ते २ मि.ली. प्रती लिटर पाणी या प्रमाणात मिसळून) फवारणी करावी आणि कुळवाच्या साहाय्याने भूमीत चांगले मिसळून घ्यावे. पीक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी आणि आवश्यकता भासल्यास एक वेळ खुरपणी करून तणांचा बंदोबस्त करावा.

१ ओ. पाणी व्यवस्थापन : पाण्याची सोय असल्यास पिकाला फांद्या फुटतांना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी), पीक फुलोर्‍या करतांना (पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी) आणि शेंगा भरतांना (६० ते ७० दिवसांनी) पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाणी द्यावे.

१ औ. पीक संरक्षण : पाने खाणारी अळी, तुडतुडे, फूल किडे, खोर माशी इत्यादी किडींपासून पिकाचे संरक्षण होण्यासाठी पेरणीनंतर ३० दिवसांनी ‘मोनोक्रोटोफॉस’ (१ ते १.५ मि.ली. प्रती लिटर पाणी या प्रमाणात मिसळून) फवारणी करावी. ‘तांबेरा’ रोगापासून संरक्षण होण्यासाठी पेरणी वेळेवर करावी. फुले कल्याणीसारख्या तुलनात्मकदृष्ट्या या रोगास अल्प बळी पडणार्‍या जातीचा वापर करावा. आवश्यकता भासल्यास ‘प्रोप्रोकोनॅझॉल’ किंवा ‘हेक्झाकोनॅझॉल’ यांपैकी एखाद्या बुरशीनाशकाची (‘टिल्ट’ची) फवारणी १ लिटर पाण्यामध्ये १ मि.ली. या प्रमाणात मिसळून करावी.

१ अं. काढणी आणि उत्पादन : सोयाबीनच्या झाडाची पाने पिवळी पडून गळू लागल्यास आणि शेंगांचा रंग पिवळसर तांबूस झाला म्हणजे ‘हे पीक काढणीस सिद्ध झाले’, असे समजावे. जातीच्या पक्वतेच्या कालावधीनुसार ९० ते ११० दिवसांनी काढणी करावी. पिकाची काढणी विलंबाने झाल्यास दाणे गळण्यास प्रारंभ होतो आणि उत्पादनात घट होते. पिकाची मळणी काठीने बडवून किंवा यंत्राच्या साहाय्याने करावी. उफणणी करून भुसा आणि दाणे वेगळे करावेत. दाणे उन्हामध्ये चांगले वाळवून जाड प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून त्यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. या पिकाचे २० ते २५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पन्न मिळते.

२. तीळ

तीळ

२ अ. हवामान आणि भूमी : हे पीक अल्प ते मध्यम पावसाच्या भूप्रदेशामध्ये घेतले जाते. या पिकास उष्ण आणि कोरडी हवा चांगली मानवते. कोकणातसुद्धा काही ठिकाणी हे पीक घेतले जाते; परंतु अल्प उत्पन्न मिळते. मध्यम ते भारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणार्‍या भूमीमध्ये हे पीक चांगले येते. कोकणामध्ये हे पीक सर्व प्रकारच्या भूमीमध्ये घेतले जाते; परंतु मध्यम ते भारी भूमीमध्ये आणि पाण्याचा निचरा होणार्‍या भूमीमध्ये उत्पन्न चांगले मिळते.

२ आ. पूर्व मशागत : आवश्यकता असल्यास भूमीची एक वेळ नांगरणी करून कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन भूमी भुसभुशीत करावी. त्यानंतर मैंद (लाकडी जाड फळी) फिरवून भूमी सपाट करावी.

२ इ. पेरणीची वेळ : मान्सूनचा पाऊस चालू होऊन भूमीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यावर आणि वापसा आल्यावर जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी पूर्ण करावी.

२ ई. पेरणीची पद्धत आणि बियाणे : २ ओळींतील अंतर ३० ते ४५ सें.मी. ठेवून पेरणी करावी. बियाणे एकसारखे पडावे म्हणून बियाण्यांत बारीक वाळू मिसळून पेरणी करावी. प्रती हेक्टरी २.५ ते ३ कि.ग्रॅम बियाणे वापरावे. बियाण्यास पेरणीपूर्वी २५ ग्रॅम ‘ट्रायकोडर्मा हर्जिॲनम’ या जैवनियंत्रकाची बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर ‘ॲझोटोबॅक्टर’ जीवाणू २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. फुले तीळ नं. १, तापी आणि पद्मा या सुधारित वाणांचा उपयोग करावा.

२ उ. खत व्यवस्थापन : पूर्व मशागतीच्या वेळी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत भूमीमध्ये मिसळावे. पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र प्रती हेक्टरी आणि पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी २५ किलो नत्र प्रती हेक्टरी भूमीत चांगले मिसळावे.

२ ऊ. आंतर मशागत : पेरणीनंतर ३० दिवसांच्या आत १-२ वेळा कोळपणी आणि खुरपणी करून तणांचा बंदोबस्त करावा.

२ ए. पीक संरक्षण : तिळावर येणार्‍या मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी आणि गादमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी ४० टक्के प्रवाही ‘प्रोफेनोफॉस’ १० मि.ली. + पानावरील ठिपक्याच्या रोग बंदोबस्तासाठी २५ ग्रॅम ‘कॉपर ऑक्झिक्लोराईड’ + १० लिटर पाणी या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२ ऐ. काढणी आणि उत्पादन : पानांचा रंग पिवळा होऊन पाने गळू लागतात, खोडाचा आणि बोंडाचा रंग पिवळसर होतो, तेव्हा पीक काढणीस सिद्ध झाले, असे समजावे. साधारणपणे ८० ते ८५ दिवसांत पीक काढणीस सिद्ध होते. काढणी लवकर केल्यास बोंडातील दाणे पोचट आणि बारीक राहून उत्पादनात घट येते. काढणी विलंबाने केल्यास बोंडे फुटून तीळ शेतात गळून पडतात आणि उत्पादनात घट येते. ५ ते ७ क्विंटल प्रती हेक्टरी इतके उत्पन्न मिळते.

३. कारळा

कारळा

३ अ. हवामान आणि भूमी : हे पीक अल्प ते जास्त पावसाच्या सर्व भूप्रदेशांमध्ये घेतले जाते. तसेच सर्व प्रकारच्या भूमीमध्ये सलग पीक किंवा मुख्य पिकाच्या भोवताली संरक्षक पीक, तसेच बांधावरसुद्धा घेता येते.

३ आ. पूर्व मशागत : भूमीची नांगरट करून ती भुसभुशीत करावी. कुळवाच्या १-२ पाळ्या देऊन शेवटच्या कुळवणी पूर्वी प्रती हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत भूमीत मिसळावे.

३ इ. पेरणीची पद्धत आणि बियाणे : पाभरीच्या साहाय्याने २ ओळींमध्ये ३० सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी. प्रती हेक्टरी ६ ते ८ किलो बियाणे वापरावे. बियाणे बारीक असल्यामुळे बियाणे आणि बारीक वाळू १:१ या प्रमाणात मिसळून पेरणी करावी. आय.जी.पी. ७६, उटकमंड आणि एन्. ५ या जातींचा वापर करावा.

३ ई. आंतर मशागत : पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करून १५ सें.मी. अंतरावर एकच रोप ठेवावे. पीक पेरणीनंतर १५ आणि ३० दिवसांनी कोळपणी अन् आवश्यकता भासल्यास एक वेळ खुरपणी करून तणांचे नियंत्रण करावे.

३ उ. काढणी : जातीनुसार अनुमाने ९० ते १०० दिवसांत पीक सिद्ध होते. पिकाची फुले सुकून बोंडे काळी झाली की, पिकाची कापणी करावी. नंतर खळ्यावर १ ते २ दिवस वाळवून मळणी करावी आणि उफणणी करून भुसा अन् दाणे वेगळे करावेत. दाणे उन्हामध्ये चांगले वाळवून जाड प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. या पिकापासून ५ ते ६ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पन्न मिळते.

४. एरंडी

एरंडी

४ अ. हवामान आणि भूमी : कमी ते मध्यम पावसाच्या भूप्रदेशामध्ये अन् पाणथळ अन् विम्लयुक्त भूमी सोडून सर्व प्रकारच्या भूमींमध्ये हे पीक घेतले जाते.

४ आ. पूर्व मशागत : भूमीची एक वेळ नांगरट आणि १ ते २ वेळा कुळवणी करून भूमी सिद्ध करावी.

४ इ. पेरणीची वेळ : मान्सूनचा पाऊस चालू होऊन भूमीत पुरेशी ओल आणि चांगला वापसा आल्यानंतर जून ते १५ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी.

४ ई. पेरणीची पद्धत आणि बियाणे : गिरीजा आणि व्ही.आय. ९ या वाणासाठी (जातीसाठी) ९० x ४५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी अन् प्रती हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे वापरावे. अरूणा या जातीसाठी ६० x ४५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी आणि प्रती हेक्टरी २० ते २२ किलो बियाणे वापरावे.

४ उ. खते : ६० किलो नत्र प्रती हेक्टरी (खानदेश विभागासाठी) आणि ६० किलो नत्र + ४० किलो स्फुरद प्रती हेक्टरी (सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि नगर या जिल्ह्यांसाठी). अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी अन् उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी द्यावे.

४ ऊ. काढणी आणि उत्पन्न : या पिकाचे घड वाळल्यानंतर काढून घ्यावेत आणि मळणी करून दाणे वेगळे करावेत. दाणे उन्हामध्ये चांगले वाळवून जाड प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. या पिकापासून प्रती हेक्टरी १० ते १५ क्विंटल उत्पन्न मिळते.

संकलक : डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), एम्.एस् सी. (ॲग्रिकल्चर), पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२२)