आम्हीही युद्धासाठी सिद्ध ! – तैवान

चीनकडून तैवानपासून अवघ्या १६ कि.मी. अंतरावर सैनिकी सराव

चीनचा तैवाननजीक युद्ध सराव

बीजिंग / तायपेय – अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानला गेल्यानंतर चीन आणि तैवान यांच्यामधील संघर्ष वाढत चालला आहे. ४ ऑगस्ट या दिवशी चीनच्या सैन्याने तैवानच्या आसपासच्या ६ भागांत सैनिकी सरावास प्रारंभ केला आहे. याला ‘लाइव्ह फायरिंग’ असे नावही दिले आहे.

चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तैवानच्या सीमेपासून अवघ्या १६ कि.मी. अंतरावर हा सराव केला जात आहे. या सरावात शस्त्रे आणि दारूगोळा वापरला जात असून क्षेपणास्त्राचीही चाचणी केली जाणार आहे. हा सराव ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यापूर्वी चीनकडून तैवानपासून १०० कि.मी. अंतरावर या कवायती करण्यात येत होत्या; पण नॅन्सी यांच्या दौर्‍यानंतर चीनने हे अंतर अल्प करून १६ कि.मी.वर आणले आहे.

तैवान चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आम्हाला कोणत्याही प्रकारचा तणाव नको आहे. देश अशा परिस्थितीच्या विरोधात आहे, ज्यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो. आम्हाला युद्ध नको आहे; पण वेळप्रसंगी आम्ही युद्धासाठी नक्कीच सिद्ध राहू.

संपादकीय भूमिका

बलाढ्य चीनला रोखठोक उत्तर देणार्‍या छोटे बेट असणार्‍या तैवानकडून भारताने शिकले पाहिजे !