बिहार सरकारने ‘शुक्रवारी’ सुटी देण्यात येणार्‍या शाळांची सूची मागवली !

बिहारमधील ५०० शाळांना रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ सुटी देण्याचे प्रकरण

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमध्ये मुसलमानबहुल भागांतील ५०० हून अधिक सरकारी शाळांना रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ सुटी दिली जात असल्याचे समोर आल्यानंतर बिहार सरकारने या शाळांची सूची मागवली आहे.

१. बिहारच्या युती सरकारमधील सहभागी भाजपने ‘राज्यातील शाळांमध्ये एकाच दिवशी सुटी असली पाहिजे’, असे म्हटले आहे, तर सत्तेतील जनता दल (संयुक्त) आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर) यांचे म्हणणे आहे की, परंपरा लक्षात घेऊन विचार केला पाहिजे.

२. बिहारचे शिक्षणमंत्री आणि जनता दल (संयुक्त) पक्षाचे नेते विजय कुमार चौधरी यांनी या शाळांची सूची, तसेच अधिकार्‍यांकडून उत्तर मागितले आहे.

३. जनता दल (संयुक्त) पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांच्यामते विनाकारण वाद निर्माण केला जात आहे. (नियमांचे उल्लंघन होत असतांना त्याला विनाकारण वाद म्हणणार्‍यांना या शाळांवर कारवाई व्हावी असे वाटतच नाही, हे स्पष्ट होते ! – संपादक) त्यांनी म्हटले की, कामेश्‍वर सिंह दरभंगा संस्कृत विश्‍वविद्यालयामध्ये प्रत्येक मासाच्या प्रतिपदेला आणि अष्टमीला सुटी असते.

४. हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्युलर) पक्षाचे प्रवक्ते दानिश रिजवान म्हणाले की, कोणताही विद्यार्थी आणि पालक यांना याची अडचण नसतांना काही लोकांच्या म्हणण्यावरून हा वाद का निर्माण केला जात आहे ? (या सरकारी शाळा आहेत. याचा खर्च पालक आणि विद्यार्थी करत नाही, तर सरकार करते. सरकारने यासाठी काही नियम बनवले आहेत. त्याचे जर उल्लंघन होत असेल, तर सरकारने त्यावर कारवाई केली पाहिजे. ज्यांना हे मान्य नाही, त्यांनी शाळेतून नाव काढून टाकावे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • केवळ शाळांची सूची मागवून काय साध्य करणार ? हा केवळ लोकांना दाखवण्याचा प्रकार आहे. प्रत्यक्षात सरकारला काही करायचे नाही, हे लक्षात येते !
  • सूची मागवण्यापेक्षा अशा प्रकारे सुटी दिली जात असेल, तर ते नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई करून पुन्हा रविवारची सुटी देणे चालू करण्याचा आदेश देणे अपेक्षित आहे !