कागल (जिल्हा कोल्हापूर), २६ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि विशाळगड येथे पडझड चालू आहे. त्या संदर्भात पुरातत्व विभाग कोणतीच कृती करत नाही, तसेच दोन्ही ठिकाणच्या अतिक्रमणांविषयीही मूग गिळून गप्प आहे. तरी पुरातत्व विभागाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ शिवसेना आणि शिवप्रेमी यांच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांच्या नेतृत्वाखाली सेनापती कापशी येथे २४ जुलै या दिवशी ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या वेळी श्री. संभाजीराव भोकरे म्हणाले, ‘‘आपली अस्मिता असणार्या गडकोटांची आज दुरवस्था आहे. पन्हाळा येथील चार दरवाजाच्या जवळील तटबंदी आणि बुरुज ढासळला आहे. येथे अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. तीच अवस्था विशाळगडाची आहे. येथे समाध्या-मंदिरे दुर्लक्षित असून अतिक्रमणांवर पुरातत्व विभाग कोणतीच कारवाई करत नाही. त्यामुळे पुरातत्व विभागाला जाग आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले.
या प्रसंगी उपतालुकाप्रमुख श्री. मारुति पुरीबुवा, विभागप्रमुख श्री. अमृत पाटणकर, युवा सेना तालुकाध्यक्ष श्री. समीर देसाई, युवासेना जिल्हा समन्वयक श्री. जयसिंग टिकले, युवासेना तालुका समन्वयक श्री. कुंडलिक शिंदे, सर्वश्री युवराज येझर, बबन देसाई, किरण देसाई, प्रकाश पाटील, किरण दळवी, विलास पाटील, राहुल घोरपडे, चंदू सांगले उपस्थित होते.
संपादकीय भूमिकागड-दुर्गांवरील अतिक्रमणे आणि पडझड यांविषयी सुस्त असणारा पुरातत्व विभाग बंद का करू नये ? |