कर्करोगासारख्या गंभीर आजारातही साधनेची तीव्र तळमळ असलेल्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे (वय ७४ वर्षे) !

१६.७.२०२२ या दिवशी पहाटे ३.०६ वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे कर्करोगाने निधन झाले. २७.७.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

 (कै.) सौ. शालिनी मराठे

१. सौ. शालिनी मराठे यांनी कर्करोग हा आजार स्वीकारून सर्व गोष्टींचे आज्ञापालन करणे

‘१६.२.२०२२ या दिवशी, म्हणजे रुग्णाईत होण्याच्या दिवसापासून सौ. शालिनीने डॉ. पांडुरंग मराठे यांनी तिला ज्या गोष्टी करायला सांगितल्या, त्या सर्व गोष्टींचे शेवटपर्यंत पालन केले. पूर्वी तिला वाटायचे, ‘शस्त्रकर्म केल्यावर त्रास अल्प होतील.’ त्यामुळे ती मणिपाल रुग्णालयामध्ये जाऊन शस्त्रकर्म करण्यास सिद्ध झाली. १४.३.२०२२ या दिवशी तिला कळले की, तिला कर्करोग झाला आहे. त्या दिवशी मी तिच्या समवेत होतो. मी म्हणालो, ‘परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) काळजी घेतील.’

श्री. प्रकाश मराठे

२. परिस्थिती स्वीकारणे

कर्करोग झाल्याचे समजल्यावर ती थोडी घाबरली होती; पण लगेच स्थिरावली. गेले पाच मास ती नागेशीला होती आणि मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होतो. मी साधारण आठ दिवसांनी तिला भेटून यायचो; पण तिची कोणाबद्दल तक्रार नव्हती, तर तिला सर्वांप्रती कृतज्ञताच वाटत होती. तिला रामनाथी आश्रमात यायची पुष्कळ ओढ होती. तिला वाटायचे, ‘मी यांतून बरी झाले की, रामनाथी आश्रमात येईन.’ जसे दिवस जात होते, तशी तिची मानसिकता पालटली. तिने सर्व भार प.पू. डॉक्टरांवर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर) सोपवला.

३. आसक्ती नसणे

३ अ. नातेवाइकांच्यात न अडकणे : शालिनीला कशाचीही आसक्ती नव्हती. आजार बळावत गेला, तशी तिची विरक्ती वाढत गेली. अनेक नातलग तिला भेटायला येत असत. त्यांना बरे वाटावे; म्हणून ती त्यांच्या समवेत छायाचित्रे काढून घेत असे. ती त्यांची समजूत घालत असे. ती समोरच्याला ‘ती किती रुग्णाईत आहे’, याचा थांगपत्ता लागू देत नसे. तिला बसता येत नव्हते, तरी ती म्हणायची, ‘‘कुणी भेटायला आले, तर उठायला नको का ?’’ असे असले, तरी ती कुणात अडकली नव्हती.

३ आ. कसलीच इच्छा न रहाणे : तिने मला सांगितले, ‘‘मी तुम्हाला सर्व ऋणांतून मुक्त केले आहे. तुम्ही माझी काळजी करू नका. स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला प्रतिदिन इकडे (नागेशीला) यायला जमत नसेल, तर येऊ नका. मला केवळ भ्रमणभाष करा.’’ मी तिला विचारले, ‘‘तुझी काही इच्छा आहे का ?’’ ती म्हणाली, ‘‘मला कसलीच इच्छा नाही.’’

४. साधनेची तळमळ

अ. सौ. शालिनी सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप तळमळीने पूर्ण करत असे.

आ. ती सतत परम पूज्यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात रहाण्यासाठी प्रयत्न करत असे.’

– श्री. प्रकाश मराठे (सौ. शालिनी मराठे यांचे पती) (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०२२)


तीव्र शारीरिक त्रास शांतपणे सहन करणार्‍या आणि सर्वार्थाने आदर्श रुग्ण असलेल्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी मराठे

१. मरणप्राय यातना होत असतांनासुद्धा चिडचिड न करणे

‘सौ. शालिनी मराठेकाकू यांना काही मासांपूर्वी गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर शस्त्रकर्म करावे लागले. कर्करोगातील ‘केमोथेरपी’ हे उपचार त्यांना वयामुळे सोसणारे नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर ‘रेडिओथेरपी’द्वारे उपचार केले गेले. हे उपचार संपवून काकू आश्रमात आल्यावर त्यांना सतत उलट्या येणे चालू झाले. त्यांना दिवसाला १० ते १५ वेळा उलट्या होत होत्या. एका वेळी उलटी चालू झाल्यावर ७ – ८ वेळा उलटीची उबळ येत असे. दिवसभरात असे साधारण ७० ते १०० वेळा त्यांचे पोट पिळवटून निघत असे. यासह पोटात पाणी झाल्याने पोटदुखीही होत असे. एवढ्या मरणप्राय यातना होत असतांनासुद्धा काकूंनी कधीही चिडचिड केली नाही. वेदनांमुळे त्यांना रडू येत असे; परंतु आपल्या रडण्याचा इतरांना त्रास व्हायला नको, यासाठी त्या इतरांसमोर न रडता एकट्या असतांना अधेमधे रडत असत.

२. काकू त्यांना होणारे त्रास नेमक्या शब्दांत सांगत असत. त्या कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करत नसत. त्यांच्या या गुणामुळे वैद्यांना त्यांच्यावर त्या त्या वेळी उपचार करणे सोपे गेले.

३. त्रास ईश्वरेच्छा म्हणून स्वीकारणे

काकूंच्या खोलीत सेवेला येणार्‍या साधिकांना आपल्यापासून त्रास होऊ नये, यासाठी काकू नेहमी प्रयत्न करत असत. कोणाकडून काही चुकले, तर तेही काकू नम्रपणे सांगत असत. कोणत्याही गोष्टीचा त्रास झाला, तर त्या ते ईश्वरेच्छा म्हणून स्वीकारत असत.

फार अल्प रुग्णांमध्ये अशी सहनशीलता असते. काकूंमधील उपजत प्रेमभाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांवरील त्यांची दृढ श्रद्धा यांच्यामुळे त्यांनी ही सहनशीलता आत्मसात केली होती.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.७.२०२२)