शेखर सिंह यांचे स्थानांतर
सातारा, २३ जुलै (वार्ता.) – गत अडीच वर्षांपासून जिल्हा प्रशासनाचे उत्तरदायित्व पार पाडणारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागी बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रूचेश जयवंशी हे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील. याविषयीचे आदेश मंत्रालयातील अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी दिले.
रूचेश जयवंशी हे वर्ष २००९ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. सध्या ते अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पहात आहेत. तत्पूर्वी त्यांनी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि राज्याचे महिला बालकल्याण आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. लवकरच ते सातारा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील.
मार्च २०२० मध्ये शेखर सिंह यांनी सातारा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. नंतर कोरोना महामारी आल्याने सर्व यंत्रणेला हाताशी धरून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अत्यंत धैर्याने परिस्थिती हाताळली. कार्यकुशल आणि सर्वन्यायी जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा कार्याचा ठसा त्यांनी सातारा जिल्हावासियांच्या मनात उमटवला आहे.