श्रीलंकेच्या सध्याच्या स्थितीला चीन उत्तरदायी !

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सी.आय.ए.चे प्रमुख बिल बर्न्स यांचा दावा

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सी.आय.ए.चे प्रमुख बिल बर्न्स

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सी.आय.ए.चे प्रमुख बिल बर्न्स यांनी श्रीलंकेतील सध्याच्या आर्थिक स्थितीला चीनला उत्तरदायी ठरवले आहे. एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी म्हटले की, श्रीलंका चीनच्या डावपेचांना समजू शकली नाही आणि ती त्यात फसली. श्रीलंकेच्या आर्थिक दिवाळखोरीला चीनकडून कर्जाच्या माध्यमांतून श्रीलंकेत करण्यात आलेली गुंतवणूक कारणीभूत आहे. या कर्जाच्या जाळ्यात श्रीलंका फसली. श्रीलंकेच्या या चुकीकडे अन्य देशांनी चेतावणी म्हणून पाहिले पाहिजे. यातून त्यांनी धडा घेतला पाहिजे.

रानिल विक्रमसिंघे राष्ट्रपती बनवल्यावरही नागरिकांचे आंदोलन चालूच !

श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती म्हणून माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना नियुक्त करण्यात आल्यानंतरही श्रीलंकेतील लोकांचे आंदोलन थांबलेले नाही. त्यांचा आरोप आहे की, राजपक्षे परिवाराने त्यांचा मोहरा म्हणून विक्रमसिंघे यांना पदावर बनवले आहे. यामुळे स्थितीत पालट होणार नाही. सत्ता वाचवण्यासाठी राजपक्षे परिवाराने विक्रमसिंघे यांचे नाव या पदासाठी सूचवले आहे. हा लोकांचा विश्‍वासघात आहे.

कोलंबो येथील प्राध्यापक एम्.जी. थाराका यांनी सांगितले की, गेल्या ३ मासांत सरकारमध्ये सहभागी नेत्यांनी स्थितीत सुधारणा करण्यासाठी अनेक गोष्टी केल्याचे दावे केले; मात्र स्थिती सुधारलेली नाही. आंदोलनकर्त्यांना वाटते की, विक्रमसिंघे यांना राष्ट्रपती पदावर बसवून राजपक्षे परिवार स्वतःवरील आरोपांपासून वाचू पहात आहे.

संपादकीय भूमिका

चीन असो कि अमेरिका, स्वतःला महासत्ता समजणारे हेदेश लहान देशांना त्यांच्या विविध जाळ्यांत ओढून त्यांचा सर्वनाश करतात, हे लक्षात घ्या !