संपादकीय
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी त्यांच्या देशातील मुसलमानांना बहुतेक पहिल्यांदाच थेट आवाहन करत ‘चिनी परंपरा आणि चिनी समाज यांच्याप्रमाणे स्वतःमध्ये पालट करा’, असे सांगितले. शी जिनपिंग यांच्या या विधानाचा अर्थ नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. ‘जिनपिंग यांना असे का सांगावे लागले ?’, याचा विचार केला पाहिजे. ‘कुठल्याही देशातील जनता जर तेथे जन्माला आलेली आहे, तेथे तिचे पूर्वज जन्माला आले आणि राहिले, त्या जनतेला असे का सांगावे लागत आहे ? ती त्यांच्या देशाची मूळ संस्कृती, परंपरा आणि समाज यांच्याशी मिळूनमिसळून का वागत नाही ? तसे वागण्यासाठी तिला का सांगावे लागत आहे ?’, असे प्रश्न उपस्थित होतात. काही शतकांपूर्वी पूर्वीच्या पर्शियातून म्हणजे आताच्या इराणमधून पारशी समुदाय भारतातील गुजरातमध्ये आला. तेव्हा त्याने तेथील राजाकडे त्यांना शरण देण्याची मागणी केली. ‘आम्ही दुधात साखर विरघळते, तसे या देशात राहू’, असे वचन दिले. हे वचन ते आजही पाळत आहेत. उलट या देशाच्या जडणघडणीत पारशी समुदायाचा मोठा हातभार आहे, हे वेगळे सांगायला नको. तसे मुसलमानांच्या संदर्भात जेथे ते अल्पसंख्यांक आहेत, तेथे दिसून येत नाही, ही वस्तूस्थिती आहे, हे लक्षात येते. शी जिनपिंग यांनी जे सांगण्याचे धाडस केले, ते भारतातील एकाही शासनकर्त्याने कधी केलेले नाही आणि पुढेही करण्याची शक्यता नाही.
वैचारिक शुद्धीकरण !
गेल्या काही वर्षांपासून चीनमधील शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांवर चीनकडून अत्याचार केला जात असल्याचे समोर येत आहे. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष या उघूर मुसलमानांना त्यांच्या इस्लामी आचरणातून बाहेर काढून चिनी परंपरांप्रमाणे आचरण करण्यासाठी बाध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. जवळपास १० लाख उघूर मुसलमानांना प्रशिक्षणाच्या नावाखाली शिबिरांमध्ये कोंडून ठेवण्यात आले आहे. त्यांची वेशभूषा, त्यांचे आचारविचार, त्यांचे रहाणीमान आदी सर्वच स्तरावर त्यांच्यात पालट करण्यात येत आहे. त्यांना इस्लामी आचरणापासून अधिकाधिक दूर नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चीन करत आहे. विशेष म्हणजे या विरोधात अमेरिका आणि काही युरोपीय देश सोडले, तर कुणीही बोलत नाहीत. भारतही यावर मौन बाळगून आहे. इतकेच नव्हे, तर एरव्ही जगात मुसलमानांच्या संदर्भात आणि विशेष म्हणजे भारतात काही घडले, तर त्यांच्या साहाय्यासाठी धावून येणारी इस्लामी देशांची संघटनाही याविषयी मौन बाळगून आहे. इस्लामचा सर्वाधिक महत्त्वाचा देश असलेला सौदी अरेबिया हाही यावर मौन बाळगून आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आतापर्यंत चीन याविषयी उघडपणे काहीच बोलत नव्हता, काहीच सांगत नव्हता, प्रसारमाध्यमांना याची कोणतीही माहिती मिळू नये, यासाठी प्रयत्न करत होता, त्या चीनचे राष्ट्रपतीच थेट मुसलमानांना आता चिनी परंपरांप्रमाणे स्वतःत पालट करण्याचे आवाहन करत आहेत, हे महत्त्वाचे आहे. यातून स्पष्ट लक्षात येते की, चीनकडून मुसलमानांचे वैचारिक शुद्धीकरण केले जात आहे. यातून मुख्यत्वे मुसलमानांची मुळातच असलेली हिंसक आणि धर्मांध वृत्ती नष्ट करणे, हा उद्देश असल्याचे म्हटले जात आहे.
धाडस दाखवावे लागेल !
ज्या शिनजियांग प्रांतातील हे उघूर मुसलमान आहेत, तेथे आधीपासूनच जिहादी संघटना कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी चिनी लोकांवर अनेक आक्रमणे केली आहेत. सुरक्षादलांशी त्यांच्या चकमकीही घडल्या आहेत. यात अनेकांचा जीव गेला आहे. जेव्हापासून चीनने १० लाख उघूर मुसलमानांना कोंडून ठेवले आहे, तेव्हापासून अशा घटना घडणे जवळपास बंद झाले आहे. म्हणजे चीनचा एक उद्देश यशस्वी झाल्याचेच म्हटले जाऊ शकते. हा शिनजियांग प्रांत रशिया आणि मध्य आशिया यांच्या सीमेवर आहे. येथील उघूर मुसलमानांना इस्लामी देशांतून जिहादी कारवायांसाठी साहाय्य मिळू नये, त्याद्वारे देशात अशांतता आणि आतंकवादी घटना घडू नयेत, हेही चीनचे उघूर मुसलमानांना शिबिरांमध्ये कोंडून ठेवण्याचे एक कारण आहे. आज संपूर्ण जग इस्लामी आतंकवादामुळे त्रस्त झाले आहे. भारत गेली ३ दशके हा अनुभव घेत आहे. देशात प्रतिदिन कुठे ना कुठे जिहादी वेगवेगळ्या माध्यमांतून हिंदूंवर आक्रमणे करत आहेत, ते पहाता ‘चीन जे काही करत आहे, ते योग्य आहे’, असे कुणालाही वाटेल; मात्र प्रश्न असा आहे की, हे लोकशाही देशात कधीतरी होऊ शकेल का ? जर नाही, तर या देशांतील जिहादी कारवाया, इस्लामी आतंकवाद कसा निपटून काढायचा ? यावर कुणाकडेच उत्तर आहे, असे नाही. ही वस्तूस्थिती आहे. भारतात काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना पलायन करावे लागले. आज एकही हिंदु पुन्हा तेथे रहाण्यास जाऊ शकत नाही, ही स्थिती आहे. अशा वेळी भारताने काय निर्णय घ्यायला हवा ? याचे उत्तर भारताकडे नाही. दुसरीकडे युरोपीय देशांमध्ये मध्य-पूर्व देशांतून शरणागत म्हणून गेलेले मुसलमान हिंसाचार करत आहेत. तेथील अनेक देशांतील कायदा आणि सुव्यवस्था यांच्यावर प्रचंड परिणाम झाला आहे. तेथे या मुसलमान शरणार्थींच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. जर्मनीसारख्या देशात या मुसलमानांना हाकलण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. तेथे चीनप्रमाणे हुकूमशाही नाही आणि जागतिक स्तरावर त्या देशांची इतकी पतही नाही की, त्यांच्या विरोधात असे काही केल्यावर जग शांत राहील. या परिस्थितीमुळेच आज चीन वगळता जगात जो काही इस्लामी आतंकवादाचा उच्छाद चालू आहे, तो थांबू शकलेला नाही किंवा थांबू शकत नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे चीन प्रयत्न करत आहे, त्याचे राष्ट्रपती जसे चिनी मुसलमानांना आवाहन करत आहेत, त्या मार्गाने जाण्यासाठी जिहादी आतंकवाद पीडित देशांना कठोर व्हावे लागेल आणि संघर्ष करावा लागेल. त्याचे फळ चांगलेच मिळेल, यात शंका नाही. असे कधी होईल का ? याचीच आता वाट पहाणे आपल्या हातात आहे. भारतातही वेगळी स्थिती नाही. भारतात इंडोनेशियानंतर मुसलमानांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारतात तर असे काही करणे पुष्कळ धाडसाचे ठरेल.
जगभरातील जिहादी आतंकवादी कारवाया मुळासकट नष्ट करण्यासाठी जग संघटित कृती करेल का ? |