बंगालमधील सत्ताधारी पक्षाने हिंदु धर्माचा अवमान थांबवावा ! – बंगाल साधू समाजाची चेतावणी

कोलकाता – बंगालमधील सत्ताधारी पक्षाने मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, तसेच हिंदु धर्माचा अवमान करणे थांबवावे, अशी चेतावणी बंगालच्या साधू समाजाने दिली. ‘भारत सेवाश्रम संघा’चे स्वामी प्रदीप्तानंदजी (कार्तिक महाराज) यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ३७ हून अधिक धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेऊन सत्ताधारी पक्षाकडून होत असलेल्या सनातन धर्माच्या अवमानाविषयी तक्रार केली. या शिष्टमंडळात अनेक साधू सहभागी झाले होते. या वेळी राज्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी उपस्थित होते. तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी श्री कालीमातेच्या विरोधात विडंबनात्मक वक्तव्य केल्याचा उल्लेख राज्यपालांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. हिंदूंच्या देवतांविषयी असभ्य वक्तव्ये आणि जिहाद्यांकडून हिंदूंची मंदिरे अन् पूजाविधी यांमध्ये अडथळे आणणारे प्रकार  राज्यात नियमितपणे वाढत आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे. हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी साधू समाजाने केली आहे.

राज्यपाल धनखड यांनी साधूंच्या शिष्टमंडळाला कायद्यानुसार कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. श्री कालीमाता आणि भगवान शिव यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी  महुआ मोईत्रा आणि मणिमेकलई यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

साधूंना अशी मागणी करावी लागणे ममता बॅनर्जी सरकारला लज्जास्पद ! हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवरील आघात रोखू न शकणारे मममा बॅनजी सरकार केंद्र सरकारने बरखास्त करावे, अशी हिंदूंची मागणी आहे !