‘संतांविषयी अनेक साधकांना अनुभूती येत असतात; पण संतपद प्राप्त होण्याच्या आधीपासून सर्वांशी सहजतेने वागणारे आणि निरपेक्षपणे काळजी घेणारे संत म्हणजे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ ! मला त्यांचा पुष्कळ आधार वाटतो. ते दोघेही माझी आई-वडील घेऊ शकतील, त्यापेक्षा अधिक काळजी घेतात. माझी प्रकृती व्यष्टी आहे. अती सुरक्षित वातावरणात राहिल्यामुळे, आयुष्यात टक्केटोणपे न खाल्ल्यामुळे किंवा माझा स्वभाव यांमुळे मला समष्टीत रहाणे पुष्कळ कठीण वाटायचे. ते दोघे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझी घेतलेली काळजी यांमुळेच मी इतकी वर्षे आश्रमात राहू शकले. ते दोघेही संत होण्यापूर्वीचे काही अनुभव आणि त्रासामध्ये देवाने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझी घेतलेली काळजी येथे दिली आहे.
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
१ अ. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सूक्ष्मातून मंडल काढल्यावर माझे कण्हणे उणावणे : मी आश्रमात रहायला आल्यापासून माझ्या त्रासाची तीव्रता वाढत गेली. मला रात्रीची शांत झोप लागत नसे. रात्रभर मी कण्हत असायची. माझे एक नातेवाईक आश्रमात आले होते. तेव्हा माझी स्थिती पाहून त्यांना माझी काळजी वाटली होती. माझ्या खोलीत झोपणार्या काही साधिका सकाळी मला विचारायच्या की, ‘रात्री तुम्ही इतक्या कण्हत आणि ओरडत का होतात ? तुम्हाला काय त्रास होत आहे ?’ रात्री इतका त्रास होऊनही देवाच्या कृपेने मला त्याची जाणीव नसायची. त्यामुळे मी त्यांना काहीच सांगू शकत नव्हते.
वर्ष २०१० मध्ये आम्ही एका संशोधनाच्या निमित्ताने आमच्या गावी नाटे (जिल्हा रत्नागिरी) येथे गेलो होतो. त्या वेळी रात्री मी कण्हले की, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ माझ्याभोवती सूक्ष्मातून मंडल घालायच्या. त्यामुळे माझे कण्हणे उणावायचे.
देवाची इतकी कृपा आहे की, रात्रभर अशी अशांत झोप लागूनही देव दिवसभर माझ्याकडून चांगली सेवा करवून घेत असे आणि कुठल्याही साधिकेने ‘तुमच्यामुळे माझी झोपमोड होते’, असे गार्हाणे केले नाही.
१ आ. त्रासाविषयी काहीही न सांगताही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सूक्ष्मातून नामजपादी उपाय करणे : आश्रमात माझी खोली श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या खोलीच्या बाजूला होती. अनेक वेळा मला त्रास होत असल्याने मी झोपून असायचे. त्या वेळी त्या खोलीत येऊन मला प्रेमाने विचारायच्या, ‘‘काकू, काय त्रास होतोय ?’’ मी ‘काही नाही’, असे सांगायचे. थोड्या वेळाने त्या पुन्हा येऊन विचारायच्या. तेव्हाही मी ‘काही नाही’, असेच सांगायचे. संध्याकाळी थोडे बरे वाटल्यावर मी त्यांना ‘त्या वेळी काय त्रास होत होता’, हे सांगायचे. ‘मला त्यांच्यापासून काही लपवायचे आहे’, असे नसायचे; पण मी अनेक वेळा अनुभवायचे की, मला आतून बोलायचे असूनही अनिष्ट शक्ती माझे तोंड कुलुप लावल्याप्रमाणे बंद ठेवायच्या. सर्वसाधारण मनुष्याची ‘काही सांगत नसेल, तर सांगेल, तेव्हा पाहू’, अशी वृत्ती असते. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे वैशिष्ट्य म्हणजे मी त्यांना काहीही सांगितले नसूनही त्या माझ्यासाठी नामजपादी उपाय करायच्या. त्यामुळे अल्प कालावधीत माझी स्थिती चांगली व्हायची. यासाठी मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. व्यवहारात पाहिले, तर कुणीही असे कुणासाठी करणार नाही.
१ इ. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे मानस सेवा केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ३ घंटे नामजपादी उपाय अल्प करण्यास सांगणे : काही वर्षांनी माझा त्रास वाढल्यावर मला पूर्णवेळ नामजपादी उपाय सांगण्यात आले होते. तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे उपाय करायचे; पण मला उपायांपेक्षा सेवेची ओढ अधिक असायची. त्यामुळे उपाय पूर्ण झाल्यावर रात्री मी सेवा करण्याचा प्रयत्न करायचे; परंतु तेव्हा मला सेवा सुचत नसे. त्या वेळी ‘सेवा करता येत नाही’, याचे मला पुष्कळ वाईट वाटायचे. एकदा मी या संदर्भात श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याशी बोलले. तेव्हा त्यांनी मला मानस सेवा करायला सांगितली. उपायांच्या वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील सेवा मानसरित्या करायचे. त्यानंतर एकदा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटले असता त्यांनी मला उपाय ३ घंटे अल्प करण्यास सांगितले.
१ ई. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे साधक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले काळजी घेत असल्याने आश्रमात राहून निश्चिंतपणे साधना करू शकणे : काही प्रसंगांत मला ‘काय करायचे किंवा माझे काय चुकते ?’, हे लक्षात यायचे नाही. त्यामुळे मला पुष्कळ भीती वाटायची. एकदा मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याशी बोलल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही धर्माच्या बाजूने आहात. देव तुमची काळजी घेईल.’’ आज मी त्याची प्रचीती घेत आहे. खरेतर मी आता जशी आहे किंवा वागते, तसे माझे व्यक्तीमत्त्व नाही; पण बर्याच वेळा मला काहीच समजत नाही. साधक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले माझी काळजी घेत आहेत; म्हणून मी इतक्या त्रासातही आश्रमात राहून निश्चिंतपणे साधना करू शकत आहे.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
२ अ. स्थुलातून घेतलेली काळजी
२ अ १. स्वतःहून साधिकेसाठी चहा करणे : माझ्या त्रासाची तीव्रता आणखी वाढल्यावर झोपेची गोळी घेऊनही मला रात्रभर झोप लागत नसे. डोळ्यावर गोळीमुळे गुंगी असायची आणि पहाटे भूकही लागलेली असायची. अशा स्थितीत चहा-बिस्किट खाण्याच्या विचाराने मी स्वयंपाकघरात जायची; पण माझा तोल जात असल्याने मला चहा करून घेणे अवघड जायचे. त्या वेळी सद्गुरु काकांना मी काहीही सांगितलेले नसूनही ते स्वतःहून मला आसंदीत बसायला सांगायचे आणि त्यांच्या समवेत माझ्यासाठीही चहा करायचे. त्यानंतर मला थोडीशी झोप लागायची.
२ अ २. सद्गुरु गाडगीळकाकांना ‘माझ्यासाठीही चहा कराल का ?’, असे विचारल्यावर त्यांनी त्यांच्या समवेत माझ्यासाठीही चहा करणे : पुढे त्रासामुळे मला जेवण जायचे नाही. बर्याच वेळा मी जेवायला जायचे; पण काहीच खायची इच्छा नसल्याने पुन्हा खोलीत येऊन झोपायचे. तेव्हा मला स्वतःकडे काही खाऊ ठेवण्याचीही सवय नव्हती. दुपारी २.३० नंतर मला ‘काय करायचे ?’, ते समजायचे नाही. (त्या वेळी दुपारी ३ वाजता सद्गुरु गाडगीळकाका-काकू आणि मी चहा घेत असू.) तेव्हा मी एक-दोन वेळा शेजारी रहाणार्या सद्गुरु गाडगीळकाकांना विचारले, ‘‘तुमच्या समवेत माझ्यासाठीही चहा कराल का ?’’ त्यांनीही निःसंकोचपणे माझ्यासाठी चहा केला होता. खरेतर आताची त्यांची स्थिती पहाता कुणीही मला वेड्यात काढेल किंवा मलाही ‘मी सद्गुरु काकांना हे कसे सांगितले ?’, याची आता लाज वाटते; पण तेव्हा मला त्यांना हक्काने सांगता यायचे. ते दोघेही मला माझे वाटायचे.’
२ आ. नामजपादी उपाय करून सूक्ष्मातून घेतलेली काळजी
२ आ १. सद्गुरु गाडगीळकाकांनी १ घंटा पुष्कळ तळमळीने नामजपादी उपाय करूनही अनिष्ट शक्तींनी पुनःपुन्हा आक्रमण करणे : २६.१०.२०१९ या दिवशी काही साधकांचा निर्गुण स्तरावर प्रयोग घेण्यात आला. त्या प्रयोगातील शेवटच्या सत्रात माझ्यातील त्रास बाहेर पडला. मला हालचालही करता येत नव्हती, इतके माझे अंग ठणकत होते आणि पुष्कळ थकवाही होता. त्या वेळी सहसाधक अन्य ठिकाणी स्थलांतरित झाल्याने कुणी साहाय्य करायलाही नव्हते. मी पूर्णतः कोलमडून गेले होते. त्या वेळी उत्तरदायी साधकांनी मला सद्गुरु काकांना भेटायला सांगितले. काकांनी माझ्यासाठी पुष्कळ तळमळीने नामजपादी उपाय केले आणि माझ्यावरील आवरण काढले. प्रत्येक १० मिनिटांनी काका मला सांगायचे, ‘‘बघा ! आता त्रास न्यून झाला आहे.’’ मी डोळे मिटून निरीक्षण करत असतांनाच लगेच काकाच सांगायचे, ‘‘नाही. त्रास पुन्हा वाढला !’’ असे ते सलग १ घंटा माझ्यासाठी नामजपादी उपाय करत होते. त्या संदर्भात सद्गुरु काका म्हणाले, ‘‘वाईट शक्ती पुनःपुन्हा आक्रमण करत आहेत; म्हणून त्रास वाढत आहे.’’ तेव्हा काकांचे जेवणही व्हायचे होते; म्हणून मला वाईट वाटत होते. शेवटी मीच त्यांना सांगितले की, मी थोडा वेळ माझ्या खोलीत नामजप करून पहाते. तहान-भूक विसरून दुसर्यासाठी सद्गुरु काकांइतके निरपेक्षपणे करणे सोपे नाही.
त्यानंतर काही दिवस प्रतिदिन सकाळी ते माझ्यासाठी त्रासानुसार नामजपादी उपाय करायचे. याच कालावधीत एकदा सद्गुरु काका म्हणाले, ‘‘तुमचा त्रास लक्षात येत नाही.’’
२ आ २. बर्याच वेळा मला पुष्कळ थकवा असतो. आहार, विहार आणि औषधोपचार करूनही थकवा न्यून होत नाही. अशा वेळी सद्गुरु काकांनी दिलेल्या नामजपामुळे थकवा उणावायचा.
२ आ ३. सद्गुरु काकांनी नामजपादी उपाय केल्यावर १५ दिवस असणारी पोटदुखी थांबणे : एप्रिल २०२२ मध्ये माझे पोट पुष्कळ दुखायचे. आधुनिक वैद्यांनी त्यासाठी औषधे दिली; पण पोटदुखी थांबत नव्हती. एका वैद्यांनी ‘पोट नेमके कुठे दुखते ?’, असे विचारले, तर मला ते सांगता येत नव्हते; कारण नामजपाच्या वेळी मी पोटावर न्यास करायचे. त्या वेळी दुखण्याचे स्थान पालटत असे. मी त्यावर उपायही विचारून घेतले होते; पण पोटदुखी वाढत होती. सोनोग्राफी केली; परंतु त्यात काहीच आढळले नाही. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी त्यासाठी नामजपादी उपायच विचारून घ्यायला सांगितले. सद्गुरु काकांना सर्व सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘काळजी करू नये. तोच नामजप चालू ठेवावा.’’ त्यानंतर दोन घंट्यांत माझी पोटदुखी थांबली. मला याचे पुष्कळ आश्चर्य वाटल्याने मी काकांना विचारले, ‘‘तुम्ही नामजपादी उपाय केलेत का ?’’ तेव्हा त्यांनी माझ्यासाठी नामजपादी उपाय केल्यानेच माझी पोटदुखी थांबल्याचे लक्षात आले.
ही अगदीच थोडी उदाहरणे आहेत. बर्याच वेळा सद्गुरु काकांना नुसता त्रास कळवल्यावरही लगेच चांगले वाटू लागते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच इतक्या तीव्र त्रासातही काळजी घेणारे साधक आणि संत लाभले. त्यांनीच मला अशा प्रेमळ आणि निरपेक्ष प्रेम करणार्या कुटुंबात ठेवले, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !’
– सौ. छाया विवेक नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.७.२०२२)
|