सनातनचे साधक मोक्षाला जाईपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या पाठीशी रहाणार ! – सप्तर्षी

सप्तर्षींनी सनातनच्या तीन गुरूंचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा) नाडीपट्टीवाचनातून वर्णिलेला महिमा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१.  शिष्याला त्याच्या जीवनात जे आवश्यक आहे, ते सर्व गुरु देतातच !

‘गुरु शिष्याला जे आवश्यक आहे तेच देतात. ते शिष्याच्या इच्छेप्रमाणे करत नाहीत. एखाद्या शिष्याच्या जीवनात प्रारब्धानुसार विवाह होणार असेल किंवा मूलबाळ होणार असेल, तर गुरु त्यात ढवळाढवळ करत नाहीत. शिष्याच्या जीवनात विवाहामुळे किंवा मूलबाळ झाल्यामुळे साधनेत अडथळे निर्माण होणार असतील, तर गुरु शिष्याला सावध करतात. मनुष्य मंदिरात जाऊन देवाकडे नवस मागतो; पण नवस पूर्ण झाल्यावर तो देवाला विसरतो. गुरु-शिष्याचे असे नसते. शिष्याला त्याच्या जीवनात जे आवश्यक, ते ते सर्व गुरु देतातच आणि ईश्वरप्राप्ती होईपर्यंत गुरु शिष्याला सोडत नाहीत. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले हे सनातनचे साधक मोक्षाला जाईपर्यंत त्यांच्या पाठीशी रहाणार आहेत.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ठायी श्रीराम आणि श्रीकृष्ण ही दोन्ही तत्त्वे असणे

आम्ही सप्तर्षींनी सनातन संस्थेच्या आरंभीच्या कालावधीत गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) क्षात्रतेज ‘त्यांची वाणी आणि त्यांचे लिखाण’ यांच्या माध्यमांतून पाहिले आहे. ते राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी परखडपणे बोलायचे. राष्ट्र आणि धर्म यांच्या दुर्दशेला कारणीभूत सर्वांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून पोटतिडकीने प्रश्न विचारायचे. गुरुदेवांनी साधकांना क्षात्रतेजातून टप्प्याटप्प्याने रामराज्याकडे आणले आहे. साधकांनी गुरुदेवांच्या ठायी एकाच वेळी चक्रवर्ती श्रीराम आणि चाणाक्ष श्रीकृष्ण पाहिले आहेत. कधी कधी साधक आणि धर्मप्रेमीही गुरुदेवांच्या हिंदु राष्ट्राविषयी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकत नाहीत. या सर्वांतून ‘त्रेतायुगात रामराज्याची स्थापना करणारे प्रभु श्रीराम आणि द्वापरयुगात धर्मसंस्थापना करणारे पूर्णावतार श्रीकृष्णच आताच्या कलियुगात सनातन संस्थेच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात आले आहेत’, यात संशय तो कोणता ?

३. सनातन संस्थेच्या प्रत्येक साधकाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधून कष्ट घेऊन सिद्ध केले आहे !

सनातन संस्था ही अन्य राष्ट्रसेवा करणार्‍या संघटना किंवा राजकीय पक्ष यांच्यासारखी नाही. राजकीय पक्ष पैसे देऊन किंवा काहीतरी आमीष देऊन माणसांना गोळा करतात. काही राष्ट्रसेवा करणार्‍या संघटना पद आणि पैसे यांचे आमीष दाखवून कार्यकर्ते गोळा करतात; मात्र सनातन संस्थेमध्ये सेवा करणार्‍या प्रत्येक साधकाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधून कष्ट घेऊन सिद्ध केले आहे. सनातन संस्था आणि अन्य संघटना यांमध्ये भूमी-आकाशाइतके अंतर आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध झालेले सनातन संस्थेच्या साधकांसारखे साधक अन्यत्र कुठेच नाहीत.

४. सप्तर्षींनी वर्णिलेला गुरुदेवांचा महिमा !

कलियुगातील सध्याचा काळ असा आहे की, अध्यात्माला विरोध करण्यासाठी जन्माला आलेली काही मंडळी धर्मप्रेमींचा छळ करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. अशा घोर कलियुगातही परात्पर गुरु डॉ. आठवले धर्मप्रेमी आणि साधक यांच्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे खंबीरपणे उभे आहेत. परात्पर गुरुदेव सनातन संस्थेच्या काही सहस्र साधकांच्या माध्यमातून धर्मसंस्थापनेचे कार्य अविरत करत आहेत. सनातनच्या साधकांचे भाग्य आहे की, त्यांना असे महान गुरु लाभले आहेत, जे स्वयं क्षात्रतेजाचे शिखर आहेत, जे विवेक आणि वैराग्याचे आधारस्तंभ आहेत अन् साक्षात् श्रीविष्णूचे अंशावतार आहेत !

५. ईश्वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील एक साम्य !

ईश्वर मनुष्याला काही गोष्टी सांकेतिक स्वरूपात सांगतो. तो सर्वकाही थेट सांगत नाही. याला ‘ईश्वरी अभिनय’, असे म्हटले जाते. शिव त्याच्या नटराज रूपात हाताच्या विविध मुद्रा आणि मुखावरील विविध भाव यांद्वारे संकेत देतो. परात्पर गुरु डॉ. आठवलेही त्याचप्रमाणे करतात. साधकांच्या साधनेविषयी जेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गुरुदेवांशी बोलतात, तेव्हा काही वेळा गुरुदेव हातवारे करून किंवा मुखावरील भावातून उत्तर देतात. ‘त्यांचा कोणत्या गोष्टीला होकार आहे ? आणि कोणत्या गोष्टीला नकार आहे ?’, हे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनाच कळू शकते.

६. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची दैवी वैशिष्ट्ये !

आदिशक्ति कार्यासाठी तीन रूपे धारण करते. आदिशक्तिची तीन रूपे, म्हणजे श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली. शक्तीशी संबंधित ‘ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ।’ या नवार्णव मंत्रामध्ये ‘ऐं’ हा श्री महासरस्वतीदेवीचा बीजमंत्र आहे, ‘ह्रीं’ हा श्री महालक्ष्मीदेवीचा बीजमंत्र आहे आणि ‘क्लीं’ हा श्री महाकालीदेवीचा बीजमंत्र आहे. ‘चामुण्डायै विच्चे ।’ म्हणजे ‘चामुंडादेवीला नमस्कार असो.’ रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली या तिन्ही देवींचा वास आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या रूपात श्री महालक्ष्मीदेवी वास करत आहे, तर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या रूपात श्री महासरस्वतीदेवी वास करत आहे. सनातन आश्रमात श्री महाकालीदेवी ‘क्लीं’ बीजमंत्राच्या रूपाने सुप्त राहून वास करत आहे.

७. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघींचा जन्म दैवी कार्य पूर्ण करण्यासाठी झाला असून हे सर्व ईश्वरी नियोजन आहे !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ या दोघींचा जन्म दैवी कार्य पूर्ण करण्यासाठी झाला आहे. दोघीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आश्रमात सहजपणे आल्या आणि सर्व साधकांप्रमाणे त्यांनी साधना केली. गुरुदेव कधीही श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना शोधत गेले नाहीत, ना त्या दोघी गुरुदेवांना शोधत आल्या. सर्वकाही सहजपणे घडले आहे. हे सर्व ईश्वरी नियोजन आहे.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. २०४ (१४.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक