मिलिंद चवंडके लिखित ‘श्रीकानिफनाथमाहात्म्य’ या ग्रंथास भाविकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद !

५ भाषांमध्ये नवनाथांची ओवीबद्ध ग्रंथनिर्मिती करण्याची मागणी

नवनाथ
मिलिंद चवंडके

नगर – नाथसंप्रदायाचे संशोधक श्री. मिलिंद सदाशिव चवंडके यांच्या सिद्धहस्त लेखणीमधून साकारलेल्या ‘श्रीकानिफनाथमाहात्म्य’ या ग्रंथास विविध प्रांतामधील भाविकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अवघ्या २७ दिवसांत १ सहस्र ग्रंथ भाविकांपर्यत पोचले. साध्या, सोप्या, रसाळ, शुद्ध मराठी भाषेत ओवीबद्ध केलेल्या या ग्रंथामधील अध्याय भाविकांना अधिक भावले. करवीरपीठाच्या शंकराचार्यांनीही या ग्रंथाचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू श्रीक्षेत्र देवगड येथील ह.भ.प भास्करगिरी महाराज यांनीही या ग्रंथाचे वेगळेपण दाखवून दिले.  ‘श्रीकानिफनाथमाहात्म्य’ या मराठीमधील ग्रंथाचा अनुवाद हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि तेलगू या भाषांमध्ये करण्याची भाविकांनी मागणी केली आहे.

ग्रंथनिर्मितीसाठी मिळालेले विविध संतांचे आशीर्वाद

‘आजच्या प्रगत संगणक युगात ओवीबद्ध ग्रंथलेखन करणारे संपूर्ण विश्वात अत्यंत दुर्मिळ आहेत. महाराष्ट्रातील श्री. मिलिंद चवंडके यांच्या हातून नाथसंप्रदायावर विशेष कार्य घडेल’, हे संत पू. श्री. प्रा. अशोकजी नेवासकर यांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना नगरच्या भेटीत सांगितले होतेच. ते तंतोतंत खरे ठरले. श्रीक्षेत्र मढी येथील प.पू. श्रीकानिफनाथ संजीवन समाधी मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे विश्वस्त म्हणून कार्यभार हाती घेताच श्री. मिलिंद चवंडके यांनी गर्भगिरीतील पहिले नाथ संमेलन घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. संमेलनाचे नियोजन करतांना त्यांनी महाराष्ट्रातील नाथपीठांवरील पिठाधिपती आणि मठाधिपती यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत आशीर्वाद घेतले. या भेटीमध्येही सर्वांनी त्यांना ‘तुमच्या हातून अलौकिक कार्य घडेल’, असे सांगितले होते. नाथ संमेलनाच्या व्यासपिठावरूनही जाहीरपणे याच भविष्यवाणीचा पुनरुच्चार झाला होता.

ग्रंथामुळे भाविकांना आलेल्या विविध अनुभूती

श्री. चवंडके यांना ओवीबद्ध ग्रंथलेखनाची प्रेरणा स्वतः नाथांनीच देणे आणि पोथी लिहून पूर्ण होणे, हा नाथभक्तांसाठी मोठा कृपाप्रसादच ठरला असल्याचे घरोघरी पोचलेल्या ‘श्रीकानिफनाथमाहात्म्य’ या ग्रंथाने स्पष्ट केले. महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, दुबई, अमेरिका येथील मराठी भाषिक भाविक ग्रंथ वाचनातून येत असलेल्या प्रभावी अनुभूतींचा आनंद घेत आहेत. ‘आमच्या कुटुंबातील प्रापंचिक समस्या, वैवाहिक समस्या, नोकरीची समस्या, बाधा, अडचणी या ग्रंथाच्या नित्य वाचनामधून सुटत चालल्या आहेत’, अशा प्रतिक्रिया श्री. चवंडके यांच्याकडे येत आहेत.

‘श्रीकानिफनाथमाहात्म्य’ या मराठीमधील ओवीबद्ध ग्रंथाचा हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि तेलगू या भाषांमध्ये अनुवाद झाल्यास सर्व प्रांतांमधील भाविकांना या ग्रंथाचा लाभ मिळेल. त्यांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यास मोठे साहाय्य होईल, असे भाविकांमधून बोलले जात आहे.

आवाहन

भाविकांनी मोठ्या संख्येने या अद्वितीय कार्यास तन-मन-धन यांनी जे शक्य ते सहकार्य स्वयंस्फूर्तीने करावे. जनमानसात प्रचलित असलेल्या आणि माहात्म्य वाढवणार्‍या नवनाथांच्या कथा श्री. मिलिंद चवंडके यांना पाठवाव्यात. विभिन्न प्रांतामध्ये नवनाथांच्या मन भारावून टाकणार्‍या कथा आहेत. श्रद्धाळू भाविकांची भक्ती वाढवणार्‍या कथा जनमानसात आजही प्रचलित आहेत. विविध पुरातन ग्रंथांमध्येही नवनाथांच्या कथा आहेत. नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाथस्थळ, तपोभूमी, साधनाभूमी विविध ठिकाणी आहे. या सर्वांची विस्तृत माहिती पुरातन ग्रंथाआधारे संकलित करून श्री. चवंडके यांच्याकडे पाठवून या दैवी कार्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आठही नाथांवर ग्रंथनिर्मिती करण्याचा संकल्प

प.पू. श्रीकानिफनाथांच्या ग्रंथासारख्याच बाकी आठही नाथांच्या स्वतंत्र ग्रंथांची निर्मिती करून त्याही अशाच पद्धतीने पाच भाषांमध्ये भाविकांच्या हाती देण्याचा संकल्प श्री. मिलिंद चवंडके यांनी सोडला आहे. नवनाथांच्या ग्रंथाचे स्वतंत्र लेखन प्रथमच घडणार असल्याने आपण सर्वजण या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार ठरणार आहोत, या सद्भावनेने नाथभक्तांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहिती पाठवण्यासाठीचा पत्ता

श्री. मिलिंद सदाशिव चवंडके

स्वागत बिल्डिंग, महादेव मंदिरासमोर, अमृतकलश अपार्टमेंटजवळ, बोरूडे मळा, मु.पो.जि. अहमदनगर. (महाराष्ट्र) पिन कोड ४१४ ००१.

भ्रमणभाष – ९४२२४९५२८९.

‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’च्या निरीक्षणात ग्रंथातील दैवी शक्तीची आली प्रचीती !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे ग्रंथकार श्री. मिलिंद चवंडके यांनी या ग्रंथाच्या पाठवलेल्या सर्व अध्यायांचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या अत्याधुनिक उपकरणाद्वारे निरीक्षण केले. ‘वैज्ञानिक चाचणीचा अहवाल ग्रंथामध्ये उतरलेली नाथांची दैवी शक्ती दाखवून देणारा आणि भाविकांचा भक्तीभाव वृद्धींगत करणारा ठरला’, असे श्री. चवंडके यांनी सांगितले. भाविकांच्या मागण्यांचा विचार करून ग्रंथकार श्री. मिलिंद चवंडके यांनी ‘श्रीकानिफनाथमाहात्म्य’ या मराठीमधील ग्रंथाचा अनुवाद हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि तेलगू या भाषांमध्ये करण्याचा संकल्प केला आहे. श्रीचित्‌‌शक्ति सौ. अंजलीताई गाडगीळ यांच्या खंबीर साथीने हे अनुवादाचे कार्य प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास श्री. मिलिंद चवंडके यांनी व्यक्त केला आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून ग्रंथ निर्मितीस निधी मिळावा ! – नाथभक्तांची अपेक्षा

योगी आदित्यनाथ

नवनाथांच्या स्वतंत्र ग्रंथाचे लेखन करण्यासाठी पुरातन जनमान्य कथांचे संकलन करण्याचा शुभारंभ श्री. मिलिंद चवंडके यांनी नुकताच केला आहे. अखिल विश्वामध्ये हे नाथकार्य प्रथमच होणार आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड आणि तेलगू या पाच भाषांमध्ये नवनाथांचे पारायण ग्रंथ प्रथमच साकारणार असून प्रतिदिन वाचण्यासाठीही ते उपयुक्त ठरणार आहेत. या कार्यासाठी मोठा खर्च होणार, हे उघडच आहे. एका भाषेत नाथांचा ओवीबद्ध सचित्र ग्रंथ निर्माण करण्यास तीन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. एका नाथाच्या पाच भाषेतील ग्रंथांसाठी एकूण पंधरा लाखांचा खर्च होईल. नवनाथांचे नऊ ग्रंथ प्रत्येकी पाच भाषांमध्ये निर्माण करण्यासाठी १ कोटी ३५ लाखांचा खर्च होईल. गोरखपूर येथील प.पू. श्रीगुरुगोरक्षनाथांच्या पीठाचे अध्यक्ष योगी आदित्यनाथ यांनी हे ऐतिहासिक नाथकार्य पूर्णत्वास जाण्यासाठी सढळ हाताने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही नाथभक्तांमधून होत आहे. नाथकार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे व्रत स्वतः नवनाथांनी हाती घेतले होते. हेच व्रत या ग्रंथ निर्मितीमधून पुढे चालणार आहे.