कारागृहांतील गुन्हेगारी !

महाठग सुकेश चंद्रशेखर

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कार्य जगभरात ‘पोलीस’ नावाची यंत्रणा करत असते. गुन्हेगारांवर कारवाई करून त्यांना शिक्षा देण्याचे काम न्यायपालिका करते. अटक केलेल्या आणि शिक्षा झालेल्या आरोपींना कारागृहात ठेवण्यात येते. तेथील व्यवस्था पहाण्यासाठीही पोलीसच असतात. पोलीस गुन्हेगारांवर कारवाई न करण्यासाठी लाच घेतात, असे सर्रास दिसून येते. अशा अनेक पोलिसांवर कारवाईही केली जाते. त्यांतील अल्प जणांना शिक्षा झाल्याचे समोर येते. भारतात लाचखोरांना शिक्षा झाल्याच्या घटना दुर्मिळच असतात. मग ते पोलीस असोत कि अन्य सरकारी कर्मचारी ! यामुळे देशातील भ्रष्टाचाराच्या घटनांत घट होण्यापेक्षा त्या वाढतच असल्याचे दिसून येते. ‘आरोपीवर कारवाई करून त्याला कारागृहात टाकल्यावर त्याला त्याच्या गुन्ह्याची जाणीव व्हावी’, अशी अपेक्षा असते; मात्र जे अट्टल, सराईत आणि टोळीतील गुंड असतात, ते कारागृहातील पोलिसांना लाच देऊन स्वत:ला हव्या त्या सुविधा मिळवतात; मात्र ज्यांना हे शक्य नसते, त्यांना कारागृहात व्यवस्थेप्रमाणे जे मिळते, ते स्वीकारावे लागते. ज्या आरोपींवर आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि ज्यांना जामीनही मिळालेला नाही, त्यांना दोषी ठरवता येत नाही. त्यामुळे उद्या ते निर्दाेष घोषित झाले, तर त्यांना जितके दिवस कारागृहात ठेवण्यात आले, ती त्यांनी नाहक भोगलेली शिक्षाच म्हणावी लागते. भारतात अशा निर्दाेषांना हानीभरपाई देण्याचा आणि ज्यांनी त्यांना नाहक कारागृहात टाकले, त्यांना शिक्षा करण्याचा कुठलाही कायदा नसल्याने त्यांना त्यांचे भोग म्हणून ते सर्व भोगावे लागते.

सर्वच कारागृहांची एकाच वेळी झडती घ्या !

पैसे असणार्‍या आरोपींनी पोलिसांना लाच दिल्यावर कारागृहांत सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात, ही जगजाहीर गोष्ट आहे. पोलीस अधिकारी अनेकदा कारागृहांमध्ये अचानक झडती घेतात, तेव्हा त्यांना आरोपींकडे भ्रमणभाष संच, अमली पदार्थ, धारदार शस्त्रे आदी सापडल्याचे समोर आले आहे. यंत्रणा भ्रष्ट असेल, तर भारतात काहीही होऊ शकते, हे जनतेला पूर्णपणे ठाऊक आहे. अशा यंत्रणेमध्ये टिकून रहाण्यासाठी आणि आपली कामे पूर्ण करण्यासाठी जनतेला यात सहभागी व्हावे लागते. जर कुणी या यंत्रणेला विरोध केला, तिच्यात पालट करण्याचा प्रयत्न केला, तर अशा व्यक्तींना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा व्यक्तींच्या हत्याही केल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या फंदात पडत नाहीत; कारण ते असंघटित आहेत आणि भ्रष्ट लोक संघटित आहेत. जर शासनकर्त्यांनीच ठरवले की, भ्रष्टाचार मोडून काढायचा, तर काहीही होऊ शकते. देहलीच्या रोहिणी कारागृहात २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी अटकेत असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर हा स्वत:ला कारागृहात पंचतारांकित सुविधा मिळण्यासाठी कारागृह प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकारी यांना प्रतिमास दीड कोटी रुपये लाच देत होता. या प्रकरणी देहलीच्या गुन्हे शाखेने ८२ कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत, तर ८ जणांना अटकही केली आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना प्रतिमास दीड कोटी रुपये वाटले जात असतील, तर याला कारागृह म्हणण्यापेक्षा पंचतारांकित हॉटेलच म्हणावे लागेल. केवळ पंचतारांकित सुविधा मिळवण्याइतपत हे प्रकरण नाही, तर या कारागृहातून सुकेश याने भ्रमणभाषद्वारे खंडणीसाठी काही जणांना धमक्या दिल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी अशा घटना अन्य कारागृहांत घडल्याचे समोर आले होते. २० वर्षांपूर्वी मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याला तर एका सदनिकेत नेऊन ठेवण्यात आले होते. अशा घटना घडूनही देशात त्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना काढण्यात आली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. सुकेश हा सराईत गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याची निर्दाेष मुक्तता होण्याची शक्यता अल्पच आहे. असे असतांना तो कारागृहात राहून गुन्हेच करत असेल आणि ज्यांच्यावर ते रोखण्याचे दायित्व आहे, तेही त्यात सहभागी होत असतील, तर ही भारतीय लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. असा प्रकार आणखी किती श्रीमंत आरोपींच्या संदर्भात देशभरातील कारागृहात होत असेल, याची प्रामाणिकपणे पडताळणी करण्याची वेळ आली आहे; मात्र असे होण्याची शक्यता नाही; कारण ‘राजकारणी, वरिष्ठ अधिकारीही भ्रष्ट आहेत’, असेच जनतेला वाटते. अशा घटना रोखण्यासाठी संपूर्ण देशात युद्धपातळीवर झाडाझडती घेण्याची आवश्यकता आहे. यात जे कर्मचारी आणि अधिकारी गुन्हे करतांना सापडतील, त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून कारागृहात डांबले पाहिजे. अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. या संदर्भात जर कठोर कायदे नसतील, तर ते अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जर कुंपणच शेत खात असेल, तर देशातील कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाणार ? गुन्हेगाराला कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी ठेवले असतांना तो तेथे ऐषारामात जीवन जगत असेल, तर ‘त्याने ज्यांच्यावर अन्याय केला, त्यांना न्याय मिळाला’, असे कधीतरी म्हणता येईल का ?

व्यवस्था पालटण्यासाठी संघटित व्हा !

अशा समस्या सोडवण्यासाठी आता मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे. समाजाची नैतिकताच रसातळाला गेली असल्याने आणि ती रोखण्याचे दायित्व ज्यांच्यावर आहे, ते राजकारणीही प्रचंड वेगाने अधोगतीकडे जात असल्याने ही स्थिती पालटणे त्यांच्याकडून शक्य नाही. यासाठी ज्यांना ‘हे पालटायला हवे’, असे वाटते, त्यांनी आता पुढे येऊन संघटित होऊन प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी साधनेचे बळ आवश्यक आहे. जर या प्रामाणिक लोकांनी साधना करून असा प्रयत्न केला, तर पुढील काही वर्षांत यात पालट करता येईल. अन्यथा पुढे गुन्हेगार बाहेर असला काय आणि कारागृहात असला काय, तो गुन्हेगारी कारवाया कुठूनही करतच रहाणार आणि समाजाला त्रास होत रहाणार. ज्यांच्यावर ते रोखण्याचे दायित्व आहे, तेही यात सहभागी असणार. असे असेल, तर जनतेला न्याय कसा मिळणार ?

लाच घेऊन कारागृहांत गुन्हेगारांना सुविधा पुरवणार्‍या पोलिसांना कठोर शिक्षा करा !